कंत्राटी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे होताहेत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:14 AM2019-11-22T00:14:42+5:302019-11-22T00:14:54+5:30
दीड कोटी रुपयांचे मानधन थकले; १२ पैकी नऊ डॉक्टर संपामध्ये सहभागी
अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) कंत्राटी डॉक्टरांचे सहा महिन्यांचे तब्बल दीड कोटी रुपयांचे मानधन थकले आहे. १२ पैकी नऊ डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असल्याने रुग्णालयातील रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. यातील विशेष बाब म्हणजे कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू होताना सरकारला एक बंधपत्र लिहून दिलेले आहे. त्यानुसार कंत्राटी डॉक्टरांना संप पुकारता येणार नाही, अशी तरतूद असतानाही डॉक्टरांनी संप पुढे रेटला आहे.
डॉक्टरांना ठरलेले मानधन हे वेळेतच मिळायला पाहिजे. त्यामध्ये कोणाचे दुमत असण्याची गरज नाही. मात्र, रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड करून संप सुरूच राहणार अलेल तर ते चुकीचे असल्याचे बोलले जाते. आधीच सरकारी रुग्णालयामध्ये ४४४ मंजूर पदांपैकी १७४ विविध संवर्गातील पद रिक्त आहेत. त्यातच आता एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनावरील ताण अधिक वाढला आहे. कमी डॉक्टरांच्या संख्येमुळे रुग्णांचेही हाल होत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यच उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत असल्याने ते संतप्त झाले आहेत.
कंत्राटी डॉक्टरांच्या नेमणुकी वेळी त्यांच्याकडून सरकारने बंधपत्र करून घेतले आहे. त्यामध्ये त्यांना संपावर जाता येणार नाही, अशी तरतूद असल्याने या कंत्राटी डॉक्टरांना सेवेतून कमी करून त्यांच्या ठिकाणी नवीन कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा सरकारी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी परशुराम धामोडा आणि एनआरएचएमचे डॉ. नीलेश कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.
दीड कोटींचे मानधन कसे झाले
शासन निर्णय २ मार्च २०१५ अन्वये शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याबाबत धोरण निश्चित केले आहे.
त्यानुसार विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांना ६५ हजार इतके मानधन निश्चित केले आहे. तर या मानधनाव्यतिरिक्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सरकारच्या काही नवीन योजनांनुसार कंत्राटी पद्धतीवर असलेल्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना मासिक मानधनाव्यतिरिक्त प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी चार हजार रु पये आणि लहान शस्त्रक्रियेसाठी दोन हजार रु पये मानधन देण्यात येते. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ या डॉक्टरांना दरमहा चार ते पाच लाख रु पये मानधन मिळते, असेही सावंत यांनी सांगितले.