बाहेर कट्ट्यावरच झोपले रुग्ण; सर्वत्र उसळली संतापाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:22 PM2020-09-08T23:22:09+5:302020-09-08T23:22:28+5:30
आविष्कार देसाई रायगड : कोरोना संसर्गाचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात कोविड १९ प्रयोगशाळा सुरू ...
आविष्कार देसाई
रायगड : कोरोना संसर्गाचा अहवाल तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात कोविड १९ प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात स्वॅब टेस्ट करणाऱ्यांसाठी येणाऱ्यांची चांगलीच गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहापूरमधील काही रुग्णांची कोविड टेस्ट करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून आणले होते. संबंधित कर्मचाºयांनी त्यांना कोविड रुग्णालयाच्या कट्ट्यावरतीच सोडले. त्यानंतर, त्यातील दोन रुग्णांना त्रास होऊ लागल्याने, त्यांनी त्या कट्ट्यावरच अंग टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोग्य व्यवस्थेच्या अशा भोंगळ कारभारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. कोरोना संसर्गाचा आकडा सातत्याने वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजारांच्या वर झाली आहे. आतापर्यंत ९०३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुवातीला कोविड १९ चाचणीसाठी स्वॅब टेस्ट केल्यावर त्याची तपासणी मुंबईमधील प्रयोगशाळेत केली जायची. अहवाल येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी जात होता. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या त्यांची कोविड तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातच कोविड प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला. त्यानुसार, आता अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील परिसरामध्ये कोविड १९ प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोविड १९ चाचणी करण्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रांगा लागत आहेत. सोमवारी रुग्णांनी कोविड १९ चाचणी करण्यासाठी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.
स्वॅब घेण्यासाठी एकच आरोग्य कर्मचारी असल्याने रुग्णांना ताटकळत बसावे लागत होते. अलिबाग-शहापूर येथील काही रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. स्वॅबसाठी गर्दी असल्याने त्या रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयाच्या कट्ट्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर, ते कर्मचारी निघून गेले. संबंधित दोन रुग्णांना त्रास होत असल्याने, त्यांनी त्या कट्ट्यावरच आपले अंग टाकले. ही घटना अतिशय संतापजनक असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात येत आहेत. काही रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी याचा जाब संबंधित आरोग्य कर्मचाºयांना विचारला. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णवाहिकेतील कर्मचारी रुग्णांना वाºयावर कसे सोडून जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे की नाही? आरोग्य विभागाने याची तातडीने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड तातडीने थांबली पाहिजे. जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारली. मात्र, पुरेसा कर्मचारी उपलब्ध नसेल, तर त्याचा उपयोग काय?
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते
संबंधिताना याबाबत विचारणा करण्यात आली आहे. जिल्हा प्रयोगशाळेतील नोडल अधिकारी आणि तीन लॅब टेक्निशियन्स यांचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अपुºया कर्मचाºयांच्या बळावर काम करावे लागत आहे. लवकरच यात सुधारणा करण्यात येईल.
- डॉ.सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक