१५ वर्षांपूर्वीच प्लॅस्टिक बंदीसाठी पाटील यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:55 AM2017-10-04T01:55:58+5:302017-10-04T01:56:14+5:30
रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे.
जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे. २००२च्या सुमारास प्लॅस्टिक कॅरिबॅगची पर्यावरणीय समस्या उग्ररूप धारण करून जगासमोर उभी राहिल्यावर, आपल्यापासूनच या समस्येला आळा घालण्याचा निर्णय घेवून विद्या पाटील यांनी २००२ पासून आपल्या मयूर बेकरीत कोणताही माल कोणत्याही ग्राहकाने खरेदी केल्यावर प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केले आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा दृष्टिकोन १५ वर्षांपूर्वी सर्वांसमोर ठेवला आणि आज तो अत्यावश्यक बनला आहे.
प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केल्यावर काही काळ ग्राहकांकडून नाराजीचा सूर ऐकावा लागला, परंतु माझा माझ्या प्रत्येक ग्राहकाशी मुळात संवाद होता आणि ज्यांच्याशी नव्हता त्यांच्याशी मी तो जाणीवपूर्वक निर्माण केला. कॅरिबॅग वापराचे धोके त्यांच्या लक्षात आणून दिले.
कॅरिबॅगच्या धोक्यांच्या बाबत एक पत्रक तयार करुन ते मी माझ्याकडे येणाºया प्रत्येक ग्राहकास देवून त्यांच्यात हा विचार रुजवला. ते पत्रक मोठे करुन माझ्या बेकरीत देखील लावले. कालांतराने माझे ग्राहक माझ्याशी सहमत झाले आणि स्वत:ची कापडी पिशवी घेवून बेकरीत खरेदीला येवू लागले, असा परिवर्तनाचा अनुभव विद्या पाटील यांनी सांगितला. काही वेळेस मोठी आॅर्डर असायची त्यावेळी मी त्या ग्राहकाला, माझ्याकडे आलेल्या कच्चा मालाच्या पुठ्ठ्याचे खोके देत असे. बेकरीत कॅरिबॅग ठेवतच नसल्याने देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नसे, असेही त्यांनी सांगितले.
कॅरिबॅगची पर्यावरण समस्या ही अत्यंत गंभीर बनली आहे. तिला आळा घालण्याचे काम ती कॅरिबॅग घेणाºया ग्राहकापेक्षा, ती देणाºया व्यावसायिकानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. कॅरिबॅग दिली नाही म्हणून आपला व्यवसाय कमी होईल अशी काही वेळेस भीती व्यावसायिकास वाटते. परंतु आपल्याकडे येणाºया ग्राहकाशी काही क्षणांचा वेळ काढून जर व्यावसायिकाने संवाद साधला तर तो कॅरिबॅगचा हट्ट ग्राहक धरत नाही आणि आपल्या व्यवसायावर परिणाम देखील होत नाही, असे पाटील यांनी सांगितले.
प्लॅस्टिक न वापरण्याच्या मानसिकतेचे वृद्धीकरण
अमेरिका आणि सिंगापूरमध्ये खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर स्वतंत्र कॅरिबॅग देण्यात येत असल्याचे तेथे पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे तेथे करिबॅगचा वापर अधिक आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणारी यंत्रणा तेथे आहे मात्र त्यावर सरकारी निधी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे ते शक्य नाही.
भारतात प्लॅस्टिक वापरायचे नाही, अशी अंगभूत मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही आहे, ती मानसिकता वाढविण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तरुणाईने कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांत येणे गरजेचे
मोठे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मोठी दुकाने येथे प्लॅस्टिक कॅरीबॅक वापर टाळण्यासाठी ग्राहक जागृतीचे उपक्रम करता येवू शकतात.
महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: एनएसएस वा एनसीसीचे विद्यार्थी, युवा स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते, यांनी कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांतर्गत ग्राहकांशी या बाबत संवाद साधल्यास, बदल नक्की दिसून येईल असा विश्वास विद्यातार्इंनी अखेरीस व्यक्त केला.