पाली : अनेक वर्षांपासून पालीतील नागरिकांची शुध्द पाण्याची मागणी असताना आजतागायत कोणत्याही राजकर्त्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पालीतील नागरिकांच्या नशिबी गढूळच पाणी पिण्याची वेळ आली आहे.पाली ग्रामपंचायत सुधागड तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. पाली शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना शहरातील नागरिकांना थेट अंबा नदीतून जॅकवेलद्वारे पाणी उचलून ते पाणी टाकीत साठवून नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. हे थेट नदीतून पाणी उचलून पुरवठा केल्याने पालीकरांना निरनिराळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वरुणराजाच्या बऱ्याच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेले नागरिक जरी सुखावले असतील तरी याच पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने नदीचे पाणी गढूळ झाले आहे. हेच पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत असल्याने रोगराईला सामोरे जावे लागते की काय अशी भीती सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. पालीतील नागरिकांना शुध्द पाणी मिळण्याची व्यवस्था पाणी पुरवठा विभागासह लोकप्रतिनिधींनी करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
पालीत नागरिक पितायेत गढूळ पाणी
By admin | Published: September 11, 2015 11:23 PM