खड्डे भरण्याचे काम रखडले
By Admin | Published: July 25, 2016 03:03 AM2016-07-25T03:03:44+5:302016-07-25T03:03:44+5:30
नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ ते अवसरेदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात होती. चार दिवसांपूर्वी या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम बांधकाम खात्याने हाती घेतले होते. परंतु काम मध्येच रखडल्याने खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन छोटे मोठे अपघातही वाढले आहेत.
नेरळ - कळंब हा महत्त्वाचा जिल्हामार्ग असून, या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील नेरळ ते अवसरेदरम्यान सुमारे सात किमीच्या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परंतु या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. नेरळ -कळंब हा सुमारे १२ किमीचा रस्ता असून, नेरळ ते अवसरे या भागाचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सध्या या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
याच रस्त्यावरील नेरळ साई मंदिर परिसरात चार दिवसांपूर्वी खड्डे भरले आणि उखडलेली अशी परिस्थिती आहे. तसेच धोमोते, दहीवली, बिरदोले, अवसरे अशा ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना होत आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे रस्त्यावर पडलेले खड्डे भरावे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)