सुक्या कचऱ्यापासून पेव्हर ब्लॉक निर्मिती; कर्जत नगर परिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:49 AM2021-03-27T01:49:21+5:302021-03-27T01:49:27+5:30
कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते.
कर्जत : कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि तोडफोड केलेल्या इमारतीच्या डेंब्रिजपासून पेव्हर ब्लॉक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कर्जत शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, हा कचरा घनकचरा प्रकल्पावर जातो, यापैकी ओला कचरा बायोगॅससाठी वापरून त्याद्वारे पथदिव्यांसाठी वीज निर्मिती केली जाते. मात्र, सुक्या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या, रबर, रॅपर, गाडीचे टायर, चपला आदी तसेच तोडफोड केलेल्या इमारतींच्या डेंब्रिजचे सिमेंटमिश्रित वाळू यांचे करायचे काय, असा प्रश्न नगर परिषदेला नेहमी सतावत होता. जरी हा कचरा कोणी विकत घ्यायला आला तरी तो खरेदीदार फारच अल्प किंमत देत असे. त्यामुळे नगर परिषदेला काही विशेष फायदा होत नसे आणि या वाढत जाणाऱ्या कचऱ्यामुळे जागा अडत असे त्यावर उपाय म्हणून आता ह्या सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक तसेच रबर यावर विशिष्ट प्रक्रिया करून घनकचरा प्रकल्प परिसरात एका शेडमध्ये गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी यातून पेव्हर ब्लॉकची निर्मिती करणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, भारती पालकर, वैशाली मोरे नगरसेवक राहुल डाळिंबकर आदी उपस्थित होते.
प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात हे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. यापुढे तयार करण्यात येणारे पेव्हर ब्लॉक शहरात जिथे गरज आहे तिथे बसविण्यात येतील. पेव्हर ब्लॉक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च गृवाला कन्स्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार असून, त्यातील उत्पन्नातील काही टक्के उत्पन्न संबंधित कंपनी नगर परिषदेला देणार आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डम्पिंग ग्राऊंडमधील वाढत्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट या माध्यमातून आपोआप लावली जाईल.
डेंब्रिज आणि प्लास्टिक तसेच रबरपासून पेव्हर ब्लॉकची निर्मिती केल्याने या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या दूर झाली आहे. नगर परिषद ओडीएफ प्लस सर्टिफिकेट मिळवण्यात यशस्वी झाली आहे तसेच स्वच्छ भारत अभियान ऑल इंडिया रँकमध्ये येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी