बायोमेट्रिकमुळे होणार वेळेत पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:16 AM2019-05-19T00:16:22+5:302019-05-19T00:16:47+5:30
रायगड जिल्हा परिषद। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारास होतो विलंब
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास विलंब होत असून अनेकांचे बँक कर्ज हप्ते थकल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध के ली होती. यानंतर रायगड जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. पगार फायलींच्या निर्गतीस विक्रमी वेग आला आणि पगार जमा होण्यास प्रारंभ झाल्याने आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.
आधार लिंक वेतन प्रणाली प्रभावीपणे रावबून कोणत्याही परिस्थितीत ही प्रणाली १ जून २०१९ पासून वापरात आणण्याबाबत आरोग्य सेवा विभागाच्या मुंबई मंडळाचे उप संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, पगारास होणार विलंब टाळण्याकरिता आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरी नोंदीकरिता आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे परिपत्रक रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने व पथके यांना शुक्रवारी पाठविले आहे.
आपल्या अधिपत्याखालील एकही संस्था व एकही अधिकारी व कर्मचारी आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली शिवाय राहाणार नाही. त्याचप्रमाणे सर्व संस्थेमध्ये १ जून २०१९ पूर्वी आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली वापरात येऊन जून २०१९चे वेतन या प्रणालीनुसार अदा करण्यात यावे, याची आपल्या सत्रावर दक्षता घेण्यात यावी, असे आदेश सर्व तालुका अधिकाºयांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालया मार्फत वैद्यकीय अधिकाºयांचे मासिक वेतन या प्रणालीतील हजेरीनुसार अदा करण्यात येणार आहे. सर्व तालुका अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकाºयांनी कर्मचाºयांची त्यांच्या स्तरावर वेतन देयके तयार करताना प्रणालीतील हजेरीनुसार वेतन देयके तयार करावीत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अद्यापही बायोमेट्रिक मशिन्स बसवले नसतील त्यांनी तत्काळ त्याबाबत कार्यवाही करावी. याबाबात दिरंगाईस संबंधित तालुका अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र हे जबाबदार राहातील. तसेच प्रणालीतील हजेरी नुसार संबंधित प्रा.आ. केंद्रातील कर्मचाºयांना वेतन मिळणार आहे. मशिन्स चालू राहातील या बाबत दक्षता घ्यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.
दांडीबहाद्दरांची होणार अडचण
आधार लिंक बायोमेट्रिक प्रणालीमुळे दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाºयांची मोठी अडचण होणार आहे. अनेक अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळत येत नाहीत तर कार्यालयीन वेळेआधी निघून जातात, याची अनुभूती यापूर्वी अनेकदा आली आहे. आरोग्य उपसंचालकांच्या २२ आॅगस्ट २०१७ च्या आदेशान्वये आधार लिंक बायोमेट्रिक प्रणाली तेव्हाच अमलात येणे अपेक्षित होते. मात्र, दांडीबहाद्दरांच्या सोईसाठी ती अमलात आणली नव्हती, अशी माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. परिणामी, १ जूनपासून ही प्रमाणी प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, या बाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.