पनवेल : माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनच्या विरोधात शेकापच्या वतीने बुधवारी पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पनवेलच्या शेकाप कार्यालयापासून सुरुवात झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार विवेक पाटील यांनी केले. माथेरानच्या चारही दिशांना इको सेन्सेटिव्ह झोन लागू करण्याचे परिपत्रक २00३ रोजी केंद्र सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार कर्जत तालुक्यातील २0 गावे, खालापूर तालुक्यातील १0 गावे, पनवेल तालुक्यातील ४0 गावे तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या हद्दीतील १९ गावे या इको सेन्सेटिव्ह झोनच्या क्षेत्राअंतर्गत अंशत: अथवा पूर्णपणे येत आहेत. या गावांवरील इको सेन्सेटिव्ह झोनच्या मर्यादांमुळे विकासकामांत अडथळा निर्माण होतो, तसेच घरांची पुनर्बांधणी, दुरु स्ती, नव्याने उभारणी आदी कामांस निर्बंध येत आहेत. या विभागात येऊ पाहणाऱ्या औद्योगिक विकासाला देखील चांगलाच चाप बसला आहे.पनवेल तालुक्यातील सर्वाधिक गावे या इको सेन्सेटिव्ह झोनच्या प्रभावाखाली आलेली आहेत.डॉ. के. कस्तुरीरंजन यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पनवेलमधील सर्व गावे इको सेन्सेटिव्ह झोनच्या यादीमधून वगळण्यात यावी, अशी विनंती शेकापच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)
शेकापचा पनवेल तहसीलवर मोर्चा
By admin | Published: July 08, 2015 10:34 PM