अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू विरली, पारडे सेनेकडेच झुकलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:47 AM2019-05-28T02:47:20+5:302019-05-28T02:47:43+5:30

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते.

Peacock in Alibaug, Congress magic magic, tilted towards Parde Senna | अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू विरली, पारडे सेनेकडेच झुकलेले

अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू विरली, पारडे सेनेकडेच झुकलेले

Next

- आविष्कार देसाई
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. मात्र, असे असतानाच शेकापच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या विजयी उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नाहीत. गत लोकसभा निवडणुकीपेक्षही सुनील तटकरेंच्या मताधिक्याची आकडेवारी कमी झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता; परंतु प्रत्यक्षात मात्र शेकापची जादू तटकरेंच्या विजयाला विशेष कारणीभूत ठरली नसल्याचे निकालावरून दिसून येते. श्रीवर्धन मतदारसंघानेच त्यांना सर्वाधिक मताधिक्य दिल्याने शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना धूळ चारण्यात ते यशस्वी होऊ शकले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये तटकरे यांना ९९ हजार ४६३ आणि गीते यांना ७९ हजार ४९७ मते मिळाली. फक्त १९ हजार ९६६ मताधिक्य तटकरेंना मिळू शकले. २०१४ च्या निवडणुकीत शेकाप तटकरे यांच्या विरोधात लढली होती. त्यांनी रमेश कदम यांना स्वतंत्र उमेदवारी दिली होती. कदम यांना त्या वेळी एक लाख २९ हजार मते मिळाली होती. याचा विचार करता शेकापची रायगड लोकसभा मतदारसंघात किती ताकद होती हे स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे शेकापचे आमदार सुभाष पाटील यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७५ हजार मते मिळाली होती आणि काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांना सुमारे ४५ हजार मते मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते, त्यामुळे तटकरे यांची ताकद निश्चितच वाढली होती. तटकरे हे सुमारे ८० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून निवडून येणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. २०१४ साली अलिबाग मतदारसंघात २० हजार ४१ मतांची आघाडी मिळाली होती. आताच्या निवडणुकीत १९ हजार ९६६ म्हणजे गेल्या निवडणुकीच्या मताधिक्याच्या तुलनेत फक्त ७५ मते अधिक आहेत. याचाच अर्थ शेकाप आणि काँग्रेसची जादू चालली नाही हेच आकड्यांवरून स्पष्ट होते.
शेकाप आणि काँग्रेस हे आघाडीत सामील झाल्यामुळे परस्पर पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले होते. गेली कित्येक दशके काँग्रेस आणि शेकाप हे पारंरपरिक कट्टर विरोधक राहिले आहेत. पक्षासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी तर फोडलीच आहेत, शिवाय रोटी-बेटी व्यवहारही त्यांच्यात होत नव्हता. तटकरे यांच्या जाहीरसभांमधून काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे मांडीला-मांडी लावून बसल्याचे चित्र कार्यकर्त्यांना रुचले नाही. चालून आलेली ही संधी शिवसेनेने सोडली नसती तर नवलच म्हणायचे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध मतदान यंत्रातून दाखवून दिला होता, हे आता निकालावरून स्पष्ट होत आहे. कारण अलिबाग विधानसभा मतदारसंघातून तटकरे यांना ४० हजारांहून अधिक मताधिक्य देणार असल्याचे शेकापनेते सांगत होते. मात्र, प्रत्यक्ष मतदान यंत्र उघडल्यावर वेगळेच बाहेर आले.
२०१४ साली तटकरे यांच्या सोबत असणारे महेंद्र दळवी हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत होते. दळवी यांनी २०१४ साली तटकरे यांना केलेली मदतवजा करून त्या जागी शेकापने मदत केली हे मान्य केले तरी शेकाप तटकरे यांना अलिबागमध्ये म्हणावे तसे मताधिक्य देऊ शकले नाही एवढे मात्र सत्य आहे.
>विधानसभेसाठी शेकाप-राष्ट्रवादी एकत्र?
२०१९ च्या निकालावरून आगामी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला रोखण्यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढू शकतात. मात्र, काँग्रेसला आघाडीत कितपत सामावून घेतील यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. अलिबाग विधानसभा काँग्रेस लढत आलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर अथवा त्यांच्या घरातील अन्य उमेदवारासाठी हट्ट धरला जाणार हे लपलेले नाही.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा आमदार येथून निवडून गेलेला आहे, त्यामुळे शेकाप हक्क सोडणार नाही. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल आणि उरणवर हक्क सांगू शकतो, तर कर्जत आणि श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसकडे कारण त्यांचे तेथे आमदार आहेत. महाड विधानसभा काँग्रेस लढत आली आहे, त्यामुळे तो त्यांच्याकडे राहू शकतो. प्रत्यक्षात हे आघाडी होणे आणि न होणे यावरच अवलंबून राहणार आहे.

Web Title: Peacock in Alibaug, Congress magic magic, tilted towards Parde Senna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.