रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी
By admin | Published: February 24, 2017 05:55 AM2017-02-24T05:55:10+5:302017-02-24T05:55:10+5:30
अत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष
जयंत धुळप / अलिबाग
अत्यंत अतितटीच्या झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी यश मिळविता आले आहे. ५९ पैकी २३ शेकापने, तर १२ राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा २० वरुन १२ वर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक शल्य लागून राहिले आहे. त्याच वेळी शेकापच्या मागील १९ जागांमध्ये वाढ होऊन त्यांना २३ जागी यश मिळाल्याने शेकाप मात्र सुखावला आहे. शिवसेनेच्या मागील १५ जागांमध्ये वाढ होवून १८ झाल्याने शिवसेनेमध्ये मात्र आनंदोत्सवच आहे.
काँग्रेसच्या जागा ७ वरून ३ वर आल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनदेखील काँग्रेसला यश संपादन करता आले नाही. भाजपाची एक जागा रायगड जिल्हा परिषदेत होती, त्यात वाढ होऊन या वेळी तीन जागी भाजपाने यश संपादन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये मोठी नाराजीची लाट पसरली. आणि लाटेचे उधाणात रूपांतर होऊन जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून सेनेत प्रवेश केला. त्याचा फायदा सेनेला झाला. तोटा मात्र, राष्ट्रवादीला सोसावा लागला. काँग्रेसच्या मागील ७ जागांवरून काँग्रेस ३ जागांवर घसरल्याने, काही ठिकाणी सेनेबरोबर आघाडी करूनही काँग्रेसला अपयशच पत्करावे लागले आहे. भाजपाने मात्र प्रगती केली आहे. केवळ एक जागा होती, तेथे तिन जागी विजय संपादन केला आहे.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विकास कामांची पोच पावती मतदारांनी दिल्याचा दावा सेनेने केला आहे. युती तुटल्यावर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली चीडदेखील सेनेच्या यशाचे मोठे गमक मानले जात आहे.