खालापूरमध्ये शेकापचा लाल बावटा

By admin | Published: January 12, 2016 12:53 AM2016-01-12T00:53:34+5:302016-01-12T00:53:34+5:30

नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकून शेकापक्षाने दणदणीत यश संपादन केले आहे. खालापूरमध्ये शेकापक्ष व शिवसेनेमध्ये कडवी लढत होईल, अशी अपेक्षा असताना

Peacock red bawata in Khalapur | खालापूरमध्ये शेकापचा लाल बावटा

खालापूरमध्ये शेकापचा लाल बावटा

Next

खालापूर : नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकून शेकापक्षाने दणदणीत यश संपादन केले आहे. खालापूरमध्ये शेकापक्ष व शिवसेनेमध्ये कडवी लढत होईल, अशी अपेक्षा असताना तालुका चिटणीस संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली शेकापने एकहाती सत्ता संपादन करीत शिवसेनेला मोठा झटका दिला. शिवसेनेला खालापूरमध्ये अवघ्या पाच जागा मिळाल्या असून, शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते खालापूरमध्ये प्रचारात उतरले होते. मात्र संतोष जंगम यांनी संयमी प्रचार करून विजय खेचून आणला. राष्ट्रवादीला खालापूरमध्ये २ जागा मिळाल्या असून, भाजपा व मनसेला मात्र मतदारांनी नाकारले आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या १७ जागांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिवसेना व शेकापमध्ये दुरंगी सामना अपेक्षित असताना शेकापने जोरदार मुसंडी मारीत शिवसेनेला चारी मुंड्या चीत केले. शेकापच्या प्रचाराची सर्व धुरा तालुका चिटणीस संतोष जंगम यांच्या खांद्यावर होती. १७ पैकी १५ जागा लढवत शेकापने १० जागांवर विजय संपादन केला. या विजयाचे खरे शिल्पकार संतोष जंगम ठरले आहेत. जंगम यांच्या पत्नी शिवानी जंगम वार्ड क्र मांक १३ मधून विजयी झाल्या असून, खालापूर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. शिवसेनेने खालापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जिल्हाप्रमुख दिनेश पाटील व उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी प्रचाराची सर्व सूत्रं आपल्या हातात ठेवली होती. खालापूरकरांनी शिवसेनेला नाकारल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. मतदारांनी मात्र शिवसेनेला नाकारले असून, १७ जागा लढविलेल्या शिवसेनेच्या पदरात केवळ पाच जागांचे दान पडले आहे.
खालापूर बाजारपेठेत तर शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली असून, ८ जागा लढवत दोन जागांवर यश मिळविले आहे. भाजपा व मनसेला खालापूरमध्ये खातेही खोलता आलेले नाही. गुलाब वाघमारे, शारदा गायकवाड, दिलीप पवार, रेणुका पवार, दीपक नाईक, संध्या मगर, शिवानी जंगम, मंगला चाळके, ममता चौधरी व राहुल चव्हाण हे शेकापचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनंजय गावंड, बाळकृष्ण पाटील, अवधुत भुर्के, सुरेखा पवार, दिलीप मणेर हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या संगीता पवार आणि कांचन गव्हाणकर यांनाही मतदारांनी नगरसेवक केले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Web Title: Peacock red bawata in Khalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.