पोह्यांसाठी ‘कर्जत शताब्दी’ शेतकऱ्यांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:19 AM2019-06-15T01:19:17+5:302019-06-15T01:19:32+5:30
कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन : शताब्दी वर्षानिमित्त भाताचे नवीन वाण विकसित
अलिबाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी या वर्षी ‘कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. ‘कर्जत शताब्दी’ या नवसंशोधित जातीच्या भातापासून उत्तम दर्जाच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकणार आहे. परिणामी, भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक भाताच्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. विद्यमान नूतन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन होऊन शिफारस करण्यात आलेली ‘कर्जत शताब्दी’ ही भाताची पहिली जात असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठाच्या संयुक्त परिषदेत ‘कर्जत शताब्दी’वर शिक्कामोर्तब राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २९ ते ३१ मे दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठात झालेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन परिषदेत ‘कर्जत शताब्दी’ या नव्या भाताच्या जातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आदी शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.
दहा वर्षांच्या संशोधनांती शोध
कर्जत येथील भाताच्या बोटवेल या स्थानिक वाणापासून ही जात विकसित करण्यात आली आहे. मूळ स्थानिक जात ही उंच वाढत असल्याने शेतात लोळून या भाताचे नुकसान होत होते. मात्र, नव्याने विकसित करण्यात आलेल्या या जातीचे वाण उंच होत नसल्याने नुकसान होत
नाही.
बोटवेल या भाताच्या स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्षे संशोधन करून ही नवी जात विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कर्जत शताब्दी ही भाताची नवीन जात मूळ बोटवेल या भातापेक्षा जवळपास हेक्टरी दुप्पट उत्पादन देणार आहे.
हेक्टरी चार टन उत्पादकतेचे बियाणे कर्जत केंद्रात उपलब्ध
कर्जत शताब्दी जातीच्या भातातून मिळणारा आखूड व जाड तांदूळ खास पोह्यांसाठी उपयुक्त ठरणार असून यापासून मोदकाचे पीठही उत्तम प्रकारचे होऊ शकते. रायगड, कर्जत, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग-फोंडाघाट येथील शेतकºयांच्या शेतात या नवीन जातीची गेली दोन वर्षे लागवड करून निरीक्षण संशोधन करून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून जात विकसित करण्यात आली आहे. कर्जत शताब्दी हे भात हेक्टरी चार टन उत्पादन देणारे असून यावर्षी पासून रायगड कर्जत केंद्रावर कर्जत शताब्दी भाताच्या वाणाचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.