कर्जत : रेल्वे स्थानकात मुंबई दिशेकडे नवीन पूल उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे. मात्र हा पादचारी पूल फलाट क्र मांक एक, दोन व ईएमयू या फलाटांनाच जोडण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे पंकज मांगीलाल ओसवाल यांना माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर कळविले आहे. म्हणजेच या पादचारी पुलाचा उपयोग फलाट क्र मांक एक, दोन व ईएमयू प्रवासीच करू शकतील. फलाट क्र मांक तीनच्या प्रवाशांना बाहेर येण्यासाठी लोणावळा एन्डकडे असलेल्या पादचारी पुलाचाच उपयोग करावा लागणार आहे. मुंबई एंडकडे पूल असावा अशी कर्जतकरांची बऱ्याच वर्षांची मागणी पूर्ण होत असली तरी हा पादचारी पूल फलाट क्र मांक तीनला न जोडून रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्यायच करीत आहे. पादचारी पुलासाठी एकूण १ कोटी ३१ लाख ५५ हजार २०७ रु पये खर्च होणार असून २३ आॅक्टोबरपर्यंत ५३ लाख २० हजार ९० रु पये खर्च झाला असल्याचे पंकज ओसवाल यांना कळविले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी रेल्वे प्रशासन सरकता जिना बांधत असले तरी कर्जतकरांना नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाला सरकता जिना असावा अशी तमाम कर्जतकरांची इच्छा जरी असली तरी तसा सरकता जिना होणार नाही असे उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले आहे. या भागात भुयारी मार्ग व्हावा किंवा लहान वाहने जाण्यासाठी छोटा पूल असावा अशी मागणी वीस- बावीस वर्षांपूर्वी कर्जतकरांनी केली होती. त्यासाठी आंदोलने झाली. काहींची डोकी फुटली. अनेकांना अटक झाली परंतु तांत्रिक कारण देऊन पूल होणार नाही असे रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी कळविले. फलाट क्र मांक एक अर्धवट आहे. पूर्वी ज्या जागेवर फाटक होते त्या जागेवर फलाट बांधला गेला नाही. त्यामुळे भिसेगावकडे जाणारे असंख्य प्रवासी सहा सात रेल्वे लाइन जीव धोक्यात घालून ओलांडतात. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालगाड्या उभ्या असल्या की अनेकांच्या नेहमीच्या गाड्या चुकतात. या पूर्वी काही पादचाऱ्यांचे रूळ ओलांडताना प्राणही गेले आहेत. परंतु रेल्वे प्रशासनाला पाझर फुटला नाही. आता येथे पादचारी पूल बांधण्यात येत आहे मात्र हा पूल फलाट तीनला जोडणार नसल्याने एवढा खर्च करूनही प्रवाशांना रूळ ओलांडूनच जावे लागणार आहे. फलाट तीनवर लांब पल्ल्याच्या गाड्या व खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुटत असतात म्हणजे प्रवाशांना आपले सामान घेऊन दूरवर असलेल्या पुणे एंडकडील जिन्यावरून जावे लागेल त्यासाठी त्यांचा पैसा, वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर फलाट तीनला हा पूल जोडावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पादचारी पूल एकाच फलाटाला
By admin | Published: January 08, 2016 2:11 AM