नेरळ ग्रामपंचायतीने उभारला पादचाऱ्यांसाठी साकव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:52 AM2018-06-21T02:52:39+5:302018-06-21T02:52:39+5:30
ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ शहरातील मोहाचीवाडी येथील जीर्ण झालेला साकव तीन महिन्यांपूर्वी कोसळला होता. तेव्हापासून या ठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून रस्ता केला होता. हा टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून जाणार असल्याने याठिकाणी ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात पादचा-यांसाठी लोखंडी साकव उभारला आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. परंतु हा छोटा साकव असल्याने या साकवावरून कोणतेही वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नेरळ शहरात येण्यासाठी मोहाचीवाडी आणि परिसरातील आदिवासी ग्रामस्थांसाठी काही वर्षांपूर्वी मोहाचीवाडी साकव उभारण्यात आला होता. तो साकव जीर्ण झाला असल्याने तीन महिन्यांपूर्वी खडीने भरलेला ट्रक जात असताना तो कोसळला व त्यात ट्रक अडकला होता. साकव तुटल्यानंतर अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली, तर काही नेत्यांनी या साकवाला निधी मंजूर करून दिला. परंतु दोन महिने उलटूनही याठिकाणी नव्याने साकव उभारण्यात आला नव्हता. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने मातीचा भराव टाकून तात्पुरता ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला होता.
या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने या ठिकाणी नव्याने पूल उभारण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे समजते. म्हणून नेरळ ग्रामपंचायतीने पावसाळ्यात मोहाचीवाडी व परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी पादचाºयांसाठी अंदाजे २ लाख रुपये खर्च करून छोटा लोखंडी साकव उभारला आहे. या लोखंडी साकवामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय दूर होणार असली तरी या साकवावरून वाहन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
>तुटलेल्या साकवासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या कामाच्या वर्कआॅर्डरचे काम बाकी आहे. त्यामुळे हे बांधकाम होण्यास वेळ लागणार असल्याने तात्पुरता पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही म्हणून अंदाजे २ लाख रुपये खर्च करून हा लोखंडी साकव उभारला आहे, परंतु या साकवावरून वाहने नेण्यास बंदी आहे.
- मंगेश म्हसकर, सदस्य, नेरळ ग्रामपंचायत