जगभरात विराजमान होतात पेणचेच गणराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 11:53 AM2024-07-28T11:53:41+5:302024-07-28T11:54:00+5:30

गेल्या दीडशे वर्षांपासून हजारो हात दिवस-रात्र झटत असून येथील गणेशमूर्ती कार्यशाळांचा हा अविरत व उत्साहवर्धक प्रवास...

pen ganaraja reigns all over the world | जगभरात विराजमान होतात पेणचेच गणराज

जगभरात विराजमान होतात पेणचेच गणराज

दत्ता म्हात्रे, गणेशोत्सवात जगभरातील मराठी माणसांच्या घरात गणपती बाप्पा दिमाखाने विराजमान होतात. त्यासाठीचा पहिला मान मिळतो तो  रायगड जिल्ह्यातील गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर असलेल्या पेणमधील गणेशमूर्तींनाच. पुणे, मुंबई, ठाण्यापासून ते अमेरिका, कॅनडा, नेदरलँंडमध्ये अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पेणमधूनच गणेशमूर्ती पाठवल्या जातात. त्यासाठी गेल्या दीडशे वर्षांपासून हजारो हात दिवस-रात्र झटत असून येथील गणेशमूर्ती कार्यशाळांचा हा अविरत व उत्साहवर्धक प्रवास...

स्वातंत्र्यपूर्व काळात पेणमधील काही मोजक्याच कलाकारांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अल्पावधीतच तो भरभराटीस आला. आता तर देशातच नव्हे, अमेरिका, इंग्लड, सिंगापूर येथेही पेणच्या मूर्तींना प्राधान्याने मागणी आहे.

कलानगरी पेणमध्ये आता गणेशभक्तांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती कार्यशाळा मालक, कारागिरी अहोरात्र परिश्रम करताना दिसतात. पेण शहरात ४५० ते ५०० कार्यशाळांमधून दरवर्षी १२ ते १५ लाख गणेशमूर्ती घडविण्यात येतात. तर शहराच्या पश्चिमेला असलेल्या हमरापूर, जोहे, तांबडशे, कळवे या विभागांत ९०० कार्यशाळांमधून सुमारे १८ लाख गणेशमूर्तींची निर्मिती होते. एक फुटापासून १२ फूट उंचीच्या मूर्ती निर्माण करणारे हे कारखाने आहेत.

मूर्ती निर्मिती हा पेणमध्ये वर्षभर चालणारा  व्यवसाय. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या शोधात दुसरीकडे धाव घेण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे सरकारला यासाठी एक पैसाही निधी खर्च करावा लागत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करावी लागत नाही. स्वबळावर रोजगारनिर्मिती करून जगाला आकर्षित करणारी ही कला आहे. गेली पाच दशके या कलादालनात भाविकांच्या पसंतीनुसार कलाकुसर केलेल्या मूर्ती घडतात. त्यांना जगभरातून वाढती मागणी आहे.

रात्रंदिवस न थकता काम

जूनपासून या कार्यशाळांमध्ये अत्यंत वेगाने रात्रंदिवस काम सुरू होते. कामात महिला-पुरुष असा भेदभाव नाही, हे येथील वैशिष्ट्य. कलानगरी हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे विभागात ९०० कार्यशाळांमधून सुमारे १८ लाख गणेशमूर्तींची निर्मिती होते. तर पेण शहरात ४५० ते ५०० कार्यशाळांमधून १२ ते १५ लाख गणेशमूर्ती तयार होतात.

गणेशाला दरवर्षी नावीन्यपूर्ण रूप देण्यात पेण नगरी आघाडीवर आहे. त्यामुळेच दरवर्षी ४०० कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. सरासरी एका कार्यशाळेत १० कामगार काम करत आहेत. वर्षभर दहा हजार कामगार कायमस्वरूपी काम करत आहेत. यंदा पेण तालुक्यात गणेशमूर्ती निर्मितीचे ३५ लाख उद्दिष्ट सफल झाले आहे. 

पुरवठा करणार कसा?

पेणच्या कार्यशाळांत शिकणारा अकुशल कामगार रंगकाम, मातीकाम, कलाकुसर या कामांत दोन-तीन वर्षांत प्रावीण्य मिळवतो. देशभरात त्यांना चांगला पगार मिळत असल्याने ते स्थलांतरित होत असल्याने कुशल कामगारांची कमतरता भासते. परिणामी पुरवठा करणे शक्य होत नाही.

असे साकारले जातात लाडके बाप्पा

गणेशमूर्ती सुकल्यानंतर ती पॉलिश केली जाते. त्यानंतर त्यांना पांढरा वॉश कलर लावला जातो. बॉडी कलर लावला जातो. त्यांनतर शेड मारून शेला, पीतांबर, गादी फेटा यांना कलर लावला जातो. सर्वांत शेवटी डोळ्यांची आखणी केली जाते. दहा हातांच्या सहाय्याने आठवड्याभरात शंभर मूर्ती पूर्ण होतात, अशी माहिती मूर्तिकार मयूर सावळे यांनी दिली आहे. मयूर कला केंद्रातून पाच देशांत मूर्ती १५ जूनपर्यंत रवाना होतात. लंडन, दुबई, न्यूयॉर्क, कॅनडा, सिंगापूर या परदेशातील मराठी कुटुंबं गेली १० वर्षे गणेश मूर्ती मागवत आहेत. गणेश मूर्ती कार्यशाळेतून एक हजार मूर्ती या दरवर्षी रवाना होत आहेत.

पेण, हमरापूर, कळवा, जोहा, तांबडशेत, दादर, रावे, सोनकार, उरनोळी, हणमंतपाडा, वडखळ, बोरी, शिर्की या गावांमध्ये आहेत मूर्ती कार्यशाळा. गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, हैदराबाद, अमेरिका,  नेदरलँड, लंडन, दुबई, न्यूयॉर्क, कॅनडा, सिंगापूर आदी देशांत मूर्ती होतात रवाना.

१५००० महिना पगार, ५०० दिवसाची मजुरी ३३ लाख मूर्ती देश-विदेशांत. १३०० कार्यशाळा,  ४०० कोटींची  उलाढाल, २५० प्रकारच्या गणेशमूर्ती.

 

Web Title: pen ganaraja reigns all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.