अलिबाग : पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना २० डिसेंबर २०२० साली घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू आहे. दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या खटल्यातील आरोपी आदेश पाटील यांच्यावर दोष सिद्धता न्यायलयाने केली असून सोमवारी १८ डिसेंबर रोजी जन्मठेप की फाशी याचा फैसला होणार होता. सरकारी पक्षातर्फे आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी उचलून धरून या खटल्याच्या अनुषंगाने पंजाबमधील तीन खटल्यांच्या निकालाचा आधार न्यायालयासमोर युक्तिवादाततून ऍड उज्वल निकम यांनी दिला आहे. पेण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अंतिम निकाल हा ३० डिसेंबर रोजी जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय एस. राजदेकर देणार आहेत.
पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम याची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.
जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर याच्या न्यायलायात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला आहे. गुरुवारी १४ डिसेंबर रोजी खटल्याच्या सुनावणी साठी ऍड उज्वल निकम हे उपस्थित होते. जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी खटल्यातील आरोपी हा दोषी असल्याचे म्हटले आहे. विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपीवर आधीच नऊ गुन्हे दाखल असून समाजात वावरण्यास पात्र नाही. असा युक्तिवाद निकम यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सोमवारी १८ डिसेंबर रोजी जिल्हा मुख्य न्यायाधीश यांच्या न्यायालयात पार पडली.
ऍड उज्वल निकम यांनी आरोपीला फाशी द्यावी या मुद्द्यावर ठाम असून अनेक निकालाचा आधार न्यायालयात सादर करून जोरदार युक्तिवाद केला. आरोपी वकील पक्षातर्फे ही जन्मठेप मिळावी यासाठी युक्तिवाद सादर केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायलयाने ऐकला असून या खटल्याचा निकाल राखून ठेवला असून ३० डिसेंबर रोजी अंतिम निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे पेणसह जिल्ह्याचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.