पेण एसटी कर्मचारी वसाहतीचे झाले खंडर
By admin | Published: February 5, 2017 02:55 AM2017-02-05T02:55:04+5:302017-02-05T02:55:04+5:30
पेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत.
- वैभव गायकर, पनवेल
पेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. वसाहतीला पाणी पुरविणाऱ्या विहिरीजवळून गटार जात असल्याने, पिण्याचे पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ८ डेपोचे व्यवस्थापन करण्यासाठी रामवाडी येथे विभागीय आगार उभारले आहे. १९७२ मध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी वसाहत बांधण्यात आली आहे. यामध्ये १३ चाळी व तीनमजली पाच इमारतींचा समावेश आहे. ४५ वर्षांमध्ये वसाहतीच्या देखभालीकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. इमारतीची रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे करण्यात आली नाहीत. यामुळे इमारती धोकादायक बनल्या आहेत. प्लास्टर पडू लागले आहे. छतामधील लोखंड बाहेर आले आहे. ज्या तीन इमारतींमध्ये कर्मचारी वास्तव्य करत आहेत, त्यांची स्थितीही चांगली नाही. वसाहतीमध्ये १३ चाळी आहेत. चाळींचीही योग्य देखभाल केली जात नाही. वसाहतीमधील काही गटारे उघडी असून, यात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. वस्तीमध्ये कचराकुंडी नाही. टाकलेला कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थित बाहेर जात नाही. १० एकर पेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली आहे. चाळींच्या आजूबाजूला वाढलेले गवतही काढण्यात आलेले नाही.
एस. टी. कर्मचारी वसाहतीला येथील विहिरीमधून पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीपासून काही अंतरावरून गटार वाहत असल्याने, दूषित पाणी विहिरीत जाण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी वारंवार सांगूनही गटाराचा प्रवाह बदलला जात नाही. महामंडळाची करोडो रुपयांची मालमत्ता धूळ खात पडली आहे. येथील वसाहतीची पुनर्बांधणी व सुशोभीकरण करण्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशीच स्थिती राहिली, तर सर्व इमारती खाली करून कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्याची वेळ येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष
रामवाडी कर्मचारी वसाहतीमधील दोन इमारती खाली केल्या आहेत. उर्वरित तीन इमारतींची स्थितीही बिकट झाली आहे. चाळीही मोडकळीस आल्या आहेत. पूर्ण वसाहतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे, परंतु प्रशासनाकडून अद्याप पुनर्बांधणीसाठी फारशा हालचाली झालेल्या नाहीत. यामुळे भविष्यात टप्याटप्प्याने सर्व इमारती खाली केल्या जाण्याची शक्यता आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा विसर
रामवाडी बस आगार व कर्मचारी वसाहतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे.
रोडच्या बाजूला कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन खराब झाल्याने, आगाराच्या मागील बाजूला पाणी बाहेर आले असून, दुर्गंधी पसरली आहे.
प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूलाही कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.
१० एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली असली, तरी देखभाल दुरुस्तीअभावी तिची दुर्दशा झाली आहे.