पेणचे विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:06 AM2018-08-19T04:06:44+5:302018-08-19T04:07:14+5:30
वरसईतील २८६ मुलांची पुन्हा तपासणी; २७ विद्यार्थ्यांना तापाची लागण; उपचारासाठी दाखल
पेण : पेण-वरसई येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील मुलांना तापाची लागण झाली आहे. शनिवारी अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तब्बल २८६ मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अलिबाग येथे सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्याचे वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले.
आश्रमशाळेतील १८ विद्यार्थ्यांना ताप, उलट्या, मळमळ आदीचा त्रास होऊ लागल्याने गुरुवार, १६ आॅगस्ट रोजी पेणमधील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिरावल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या पथकाने २८६ मुलांची शनिवारी पुन्हा आरोग्य तपासणी केली. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे अशासकीय समिती अध्यक्ष संजय सावळा यांनी प्रशालेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या अस्वच्छता व पोषण आहाराची पाहणी करून शाळेच्या मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे यांना सूचना दिल्या.
परिस्थिती नियंत्रणात असून येथील कर्मचारी, शिक्षक व आदिवासी समाज पेण तालुका समितीचे अध्यक्ष जोमा दरवड, सचिव हरेष वीर सदस्य कृष्णा खाकर, पांडुरंग ठाकरे, लक्ष्मण निरगुडा हे आश्रमशाळा परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सर्वस्तरांतून घेतली जात आहे. आश्रमशाळा परिसरात स्वच्छता राखण्याचे कठोर निर्देश प्रकल्प कार्यालयाने दिले आहेत.
याशिवाय २७ विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत समाजाचे समिती सदस्य, जिल्हा सिव्हिलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गवळी यांच्या सतत संपर्कात आहेत.
परिस्थिती नियंत्रणात असूनही खबरदारीचा उपाय म्हणून तपासणीअंती २७ विद्यार्थ्यांना हलविण्यात आले आहे.
वातावरणात पाच हजारांपेक्षा अधिक व्हारस आढळतात, त्यापैकी नेमक्या कोणत्या व्हायरस मुळे हा ताप आला हे नेमके सांगता येत नाही.
तीन दिवसांचा ताप हा व्हायरल ताप मानला जातो तर ८ ते १० दिवस राहिलेला ताप टायफॉइड मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेला ताप संसर्गजन्य (व्हायर) ताप असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी याच आश्रमशाळेतील १८ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य तापाची लागण झाल्याने प्रथम पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात तर त्यानंतर गुरुवारी येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
पेणमध्ये बालरोगतज्ज्ञ नाही
पेण उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने या सर्व मुलांना अलिबागला जिल्हा रुग्णालयात आणावे लागले आहे.
दरम्यान, सर्व मुलांना एकदम ताप आला नाही. १५ दिवसांपूर्वी एक-दोन जणांना आला आणि मग तो ताप आम्हा सर्वांना आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
सर्वच आश्रमशाळांची तपासणी करा
पेण आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील कर्जत तालुक्यातील चाफेवाडी, डोंगरपाडा, भालीवडी, पिंगळस, पेण तालुक्यातील सावरसई, वरसई, वरवणे, पनवेल तालुक्यातील साई, माणगाव तालुक्यातील नांदवी आणि अलिबाग तालुक्यातील कोळघर या दहा शासकीय आदिवासी आश्रमशाळांची स्वच्छता, आरोग्य आणि विद्यार्थी आरोग्य विषयक तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कर्जतमध्ये आदिवासी क्षेत्रात सक्रि य कार्यरत दिशा केंद्र संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगम यांनी एक लेखी निवेदनाद्वारे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
पेण तालुक्यातील वरसई आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जरी हे लेखी निवेदन जंगले यांनी दिले असले, तरी गेल्या १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतलेल्या बैठकीत ही मागणी केली होती. त्या वेळी सहायक आदिवासी प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे यांना डॉ. सूर्यवंशी यांनी या अनुषंगाने तत्काळ आदेश दिले होते; परंतु महिनाभरात या बाबत प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे जंगले यांनी या लेखी निवेदनात नमूद केले आहे.
आश्रमशाळांतील मुलांना पिण्याचे पाणी व दूध शुद्ध मिळत नाही. स्वच्छतेचा मोठा अभाव या आश्रमशाळांमध्ये आहे. प्रत्येक आश्रमशाळेत किमान ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या पार्श्वभूमीवर आतातरी तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी विनंती जंगले यांनी केली आहे.
आदिवासी आश्रमशाळेतील २७ विद्यार्थ्यांची तपासणी
तीन दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील वरसई येथील रायगड आदिवासी प्रकल्पांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेतील २७ विद्यार्थ्यांना शनिवारी संध्याकाळी विशेष आरोग्य तपासणीकरिता येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना संसर्गजन्य तापाची लागण झाली आहे. त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येत असून, तपासणी पूर्ण झाल्यावर ज्यांना येथे दाखल करणे गरजेचे आहे, अशा विद्यार्थ्यांना येथे दाखल करण्यात येईल, अशी माहिती विद्यार्थ्यांची तपासणी करणारे जिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष पाटील व डॉ. ललित अलकुंटे यांनी दिली.