आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नागरिकांना घेणे गरजेचेच - जयपाल पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 03:29 AM2019-06-23T03:29:34+5:302019-06-23T03:29:52+5:30
आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे.
- आविष्कार देसाई
आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपत्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी अलिबाग शहरातील एक अवलीया तसा प्रयत्न करत आहे. त्यांचे नाव आहे जयपाल पाटील. त्यांनी आजपर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. यासाठी ते राज्यासह राज्याबाहेरही जाऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगतात. त्याच आपत्तीच्या योद्ध्याशी थेट संवाद साधला.
आपत्ती व्यवस्थापनावर काम
करावे असे का वाटले?
अलिबाग तालुक्यातील काचळी येथे १९९१ साली पुराने थैमान घातला होता. आंबा नदीचे पाणी सर्वत्रच घुसले होते. त्या वेळी मी आरसीएफ कंपनीमध्ये नोकरीला होतो. आरसीएफ प्रशासनाने सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासह अन्य सहकाऱ्यांना मदतीसाठी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गाव उभे केले. त्यानंतर बºयाच वर्षांनी नागरी संरक्षण दल उरण येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेले प्रगत प्रशिक्षण सातत्याने घेत आहे. रायगड जिल्ह्याचा नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कामही केले.
नेमके कोणत्या प्रकारे आपत्ती
व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देता?
अपघात घडल्यावर जखमींना लगेच पाणी न पाजता सर्वप्रथम रुग्णवाहिका बोलवावी, आवश्यकता वाटल्यास अग्निशमन दल त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करावे. बुडलेल्यांना बाहेर काढल्यावर कोणता प्रथमोपचार द्यावा, गृहिणीचा जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो. त्यांनी गॅस, इलेक्ट्रिक उपकरण हाताना काळजी घ्यावी, साप, विंचू चावल्यावर कोणता प्रथम उपचार द्यावा, विषारी, बिनविषारी साप कसा ओळखावा याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपत्तीचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे या मताचा मी आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, पोलीस पाटील, ग्रामसेवक, साखर कारखान्यातील कामगार, पोलीस दल, सुरक्षारक्षक, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, शेतकरी, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर यांना तसेच मुंबई, सोलापूर, रत्नागिरी आकाशवाणीवरून आपत्ती व्यवस्थापनाची सुमारे २७१ व्याख्याने दिली आहेत.
शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्र
रांची येथील शिख रेजिमेंटच्या १५० अधिकाºयांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्र दिला आहे. आसाम-गोहत्ती, कर्नाटक हंप्पी येथील संपादक आणि पत्रकारांनाही आपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. आजवर जेवढी प्रशिक्षण शिबिर पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका यांचा सिंहाचा वाटा आहे.