उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 03:19 PM2023-07-30T15:19:43+5:302023-07-30T15:20:11+5:30
शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता ठाकरेंच्या पाठिशी आहे.
मधुकर ठाकूर
उरण : शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी जाहीर कार्यक्रमातून केले. उरण तालुका व उरण शहर शिवसेनाच्या वतीने शनिवारी (२९)उरण येथे सामाजिक व शैक्षणिक, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थीना वह्या आणि छत्र्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शहरातील राममंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी खासदार विनायक राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिवसेना उरण शहर व उरण तालुक्याच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,गरजूंना मोफत वह्यांचे वाटप व जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ही खूपच कौतुस्कापद व अभिमानाची बाब आहे. जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळातही जनतेची रात्रंदिवस जनतेची सेवा केली.
शिवसेनेच्या माध्यमातून परिसरात अनेक विकासकामे केली आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी जाहीर कार्यक्रमातून केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विनायक राऊत यांनी उरण तालुका व उरण शहर शिवसेनेच्या कार्याचे कौतूक करतानाच विद्यार्थ्यांनी खूप चांगले शिकून मोठे व्हा असा मौलिक सल्लाही दिला.यावेळी माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर,जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरवही करण्यात आला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत,तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिवसेना गटनेते गणेश शिंदे,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, उपतालुका प्रमुख प्रदिप ठाकूर , तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे,द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर,ग्राहक संरक्षण कक्ष तालुका संघटक धीरज बुंदे , उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर,शहर तालुका संघटक सुजाता गायकवाड, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतूल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे आदि मान्यवर उपस्थित होते.