पाणमांजरांची प्रजा माणगावच्या काळ नदीत होतेय वृद्धिंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:59 PM2019-04-14T23:59:55+5:302019-04-15T00:00:06+5:30
माणगावमधील काळ नदीतील इंडियन स्मूथ-कोटेड आॅटर अर्थात ‘पाणमांजर’ ज्याला स्थानिक भाषेत ‘हुद’ या नावाने ओळखले जाते.
- जयंत धुळप
अलिबाग : माणगावमधील काळ नदीतील इंडियन स्मूथ-कोटेड ऑटर अर्थात ‘पाणमांजर’ ज्याला स्थानिक भाषेत ‘हुद’ या नावाने ओळखले जाते. अशा नामशेष होण्याच्या मार्गावरील पाणमांजराच्या प्रजातीचे अस्तित्व सुमारे दोन वर्षांच्या अथक मेहनतीअंती शोधून काढण्यात माणगाव येथील प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना गतवर्षी ५ एप्रिल २०१८ मध्ये यश आले आणि गेल्या वर्षभरातील येथील पाणमांजरांच्या आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासांती येथील पाणमांजरांचे प्रजोत्पादन झाल्याने यंदा पाणमांजरांची येथील संख्या वाढली आहे. गतवर्षी असलेली ६ ते १० पाणमाजरांची संख्या यंदा १४ ते १५ झाल्याचे प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इंडियन स्मूथ-कोटेड आॅटर स्थानिक भाषेत हुद नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावरील पाणमांजराच्या प्रजातीचे अस्तित्व काळ नदीमध्ये होते, अशी माहिती काही वर्षांपूर्वी कुवेसकर यांना नदीमध्ये मासेमारी करणारे मच्छीमार आणि नदीकिनारच्या ज्येष्ठ ग्रामस्थांकडून मिळाली होती. तेव्हापासून ते या पाणमांजरांच्या काळ नदीतील अस्तित्वाचा शोध संपूर्ण नदीच्या किनाऱ्यांवरून फिरून सातत्याने घेत होते; परंतु त्यांना यश आले नाही. या दरम्यान त्यांनी काळ नदीमधील मगरींच्या अस्तित्वाचा अभ्यास केला. छायाचित्रे आणि चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी मगरीचे अस्तित्व आणि त्यांचे संपूर्ण जीवनमान याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संग्रहित (डॉक्युमेंटेशन) केली आहे.
गतवर्षी ५ एप्रिल २०१८ रोजी कुवेसकर यांना त्यांच्या पाणमांजर अस्तित्व शोधाच्या मोहिमेस यश आले आणि त्यांच्या आनंदास पारावारच उरला नाही. जिद्द आणि अथक मेहनतीअंती पाणमांजरांचे अस्तित्व शोधून काढण्यात त्यांना यश आले. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या पात्रात दुर्मीळ व नामशेष होत चाललेले मांसाहारी सस्तन प्राणी वर्गातील ही पाणमांजर प्रजाती असल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सर्वप्रथम गतवर्षी ‘लोकमत’च्या माध्यमातून सर्वांसमोर आणले.
काळ नदीतील पाणमांजरांच्या अस्तित्वामुळे आता काळ नदीस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळ नदीचा हा टप्पा पूर्णपणे प्रदूषणमुक्त असल्याच्या परिस्थितीवर या पाणमांजरांच्या अस्तित्वामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. परिणामी, येथील नदीचे पाणी कोणत्याही कारणास्तव प्रदूषित होणार नाही, याकरिता कुवेसकर हे नदीकिनारच्या गावांतील ग्रामस्थांना भेटून आपल्या व्यक्तिगत स्तरावरून प्रबोधन करत आहेत. नदीतील मासे, कोळंब्या, खेकडे हेच या पाणमांजरांचे खाद्य असल्याने ते येथे वस्ती करून राहत असल्याचे ते सांगत आहेत. काळ नदीत विशिष्ट प्रकारचे औषध टाकून कोळंबी पकडण्याचे आणि विशिष्ट रसायनांचा छोटा स्फोट घडवून आणून मोठे मासे पकडणे अशी दोन मच्छीमारी तंत्र येथे वापरली जातात. यातून पाणमांजरांच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो, असा एक निष्कर्ष कुवेसकर यांनी सांगितला आहे, त्याकरिताही आपला प्रबोधनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
>माणगाव पर्यटनकेंद्र बनू शकते
दुर्मीळ पाणमांजरांच्या काळ नदीतील अस्तित्वामुळे येत्या काळात माणगावची काळ नदी प्राणी अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि पर्यटक यांच्याकरिता मोठ्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. वनखात्याच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीची विशेष योजना काळ नदीकिनारच्या गावांत ग्रामस्थांच्या सहयोगाने अमलात आली, तर ग्रामस्थांना या पाणमांजरांच्या अस्तित्वामुळे आपल्याच घरी रोजगार आणि अर्थाजनाचे साधन उपलब्ध होऊ शकेल. परिणामी, काळ नदीतील पाणमांजरांच्या संरक्षणाची बांधिलकी आपोआपच ते स्वीकारतील आणि त्यातून पाणमांजरांचे संवर्धन देखील चांगल्या प्रकारे होऊ शकेल, अशा योजनेचे नियोजन कुवेसकर यांच्या डोक्यात आहे.
>इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झरवेशन आॅफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘रेड लिस्ट’प्रमाणे पाणमांजर हा सस्तन प्राणी लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या श्रेणीमध्ये येण्याचा उच्च धोका क्षेत्रात आहे. पाणमांजर हा प्राणी छोटे कळप बनवून नदीमध्ये वावर करतो, नदीमध्ये कोळंबी, खेकडे आणि इतर माशांची शिकार करताना दिसून येत असल्याचे निरीक्षण कुवेसकर यांनी सांगितले. काळ नदीतील १४ ते १५ पाणमांजरे सुमारे ७ ते ११ किलो वजनापर्यंतची असून, आकाराने मोठी असल्याचे निरीक्षण कुवेसकर यांचे आहे.