कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:26 AM2019-04-30T00:26:44+5:302019-04-30T00:26:58+5:30

चोख पोलीस बंदोबस्त : पाच वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदान

 The percentage of voting in Karjat constituency increased | कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

नेरळ : मावळ लोकसभा मतदासंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता कर्जत विधानसभा मतदारसंघाची विक्रमी मतदानाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. ५ वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्के वारी वाढली आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५६ टक्केमतदान झाले होते. यावर्षी कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार अशी शक्यता निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी मतदारांमध्ये उत्साह होता, त्यात वातावरणात असलेल्या प्रचंड उष्म्याने मतदारराजाने दुपारी घरीच बसणे पसंत केले. मात्र कार्यकर्त्यांकडून मतदारांना बाहेर काढण्यात यश आल्याने दुपारी एकनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारी तीनपर्यंत ४८.०१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. उन्हाचा त्रास कमी झाल्याने दुपारी तीनपासून पाचपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी सहभाग घेत ६१.२२ टक्के मतांची नोंद झाली. त्यानंतर देखील मतदारांच्या रांगा वाढत राहिल्याने ७० टक्के मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा फायदा खासदार श्रीरंग बारणे की पार्थ पवार यापैकी कोणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.

मतदानाला किरकोळ घटनांनी गालबोट लागले असून कर्जतचे आमदार सुरेश लाड, शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू घारे यांच्यासह अन्य आठ जणांवर मतदान केंद्राबाहेर मतदारांना आपल्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या दिल्याबद्दल पोलिसांनी या तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत. त्यात कर्जत दहिवली येथे दोन, लाडीवली, पोसरी आणि मार्केवाडी येथे एक अशा पाच तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत, तर डिकसळ येथे रजत म्हसे या मतदाराने मतदान केंद्रावर मोबाइल फोन नेण्यास बंदी असताना मोबाइल नेऊन आपला सेल्फी मतदान करीत असताना काढल्याबद्दल मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी या मतदाराविरुद्ध नेरळ पोलिसात तक्रार दिली आहे. कर्जत पोलीस ठाण्यातील पाच तक्रारी या मतदान केंद्र परिसरात आपल्या उमेदवारांचा प्रचार केल्याबद्दल नोंद करण्यात आल्या आहेत.
कर्जत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव आणि माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक महादेव आचरेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते, त्यात राज्य राखीव पोलीस दल आणि सीआरपीएफचे कमांडो तैनात होते.

चौक परिसरात शांततेत मतदान
मोहोपाडा : चौक परिसरात मतदान शांततेने पार पडले, मात्र व्हिलचेअर नसल्याने वयस्कर मतदारांचे हाल झाले. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ च्या दरम्यान मतदान केंद्र ९१ वावंढळ येथे व्हीव्हीपॅट मशिन बंद झाल्याने उन्हाचा तडाखा वाचविण्यासाठी आलेल्या मतदारांना सुमारे ५० मिनिटे रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. मशिन सुरू न झाल्याने या ठिकाणचे मतदान यंत्र बदलण्यात आल्यावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली, तर मतदान केंद्र ११२ आसरे येथे मशिन प्रक्रिया सुरू होण्यास काही मिनिटे उशिर झाला,मात्र त्याचा कोणताच परिणाम झाला नाही.

Web Title:  The percentage of voting in Karjat constituency increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.