पेरीफेरी रस्त्यावर ‘अवजड’ पार्र्किं ग
By admin | Published: February 8, 2016 02:44 AM2016-02-08T02:44:31+5:302016-02-08T02:44:31+5:30
कळंबोली स्टील मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या पेरीफेरी रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत.
कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या पेरीफेरी रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून रोडला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस, सिडको व आरटीओ यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर लोह-पोलाद मार्केटकरिता १२५, २५०,४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. मात्र ठरल्याप्रमाणे सुविधा देण्यात आल्या नाहीत. स्टील मार्केट आवारात मुख्य रस्त्यांची निर्मिती, देखभाल व इतर सुविधा देण्याची जबाबदारी सिडकोची होती. मात्र बाजार समितीकडे बोट दाखवून सिडको सातत्याने जबाबदारी झटकत होती. व्यापाऱ्यांनी सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून पेरीफेरी रोडचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करून घेतले. त्यानुसार या मार्केटच्या पेरीफेरी रोडचे काम पूर्ण केले आले. एकूण ६ कि.मी. लांबीचे हे रोडचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मुख्य रस्ता असल्याने वाहने याच रस्त्याहून मार्केटमध्ये ये-जा करतात. दररोज हजारो ट्रक, ट्रेलर मालाची चढ उतार करण्याकरिता येथे येतात. मात्र अवजड वाहनांसाठी पार्र्किं गची सुविधा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांचे पार्किंग होत असल्याने केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली असते. परिणामी रोडपाली सिग्नल ते बिमा संकुल दरम्यान वाहनांना आत बाहेर जाण्याकरिता तासन्तास अडकून पडावे लागतात. दररोज याविषयावर वाहतूकदार, वाहनचालकांमध्ये तंटे वाद होतात. आरटीओ कार्यालय सुध्दा याच रोडच्या बाजूला आहे. तरी सुध्दा कोणताही बदल किंवा सुधारणा होत नाही. या संदर्भात कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रि या मिळाली नाही.