नेरळ आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:43 AM2019-06-10T02:43:27+5:302019-06-10T02:43:53+5:30
भास्कर तरे यांची मागणी : रु ग्णांचे हाल होत असल्याने आरोग्यमंत्र्यांना दिले निवेदन
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नेरळ परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी उपोषण देखील केले. परंतु अद्याप नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर मिळाला नाही, जिल्हा प्रशासन देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे कोदिवले येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर तरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ३५ हून अधिक वाड्या व गावामधील रुग्ण उपचार घेण्यासाठी या आरोग्य केंद्रात येत असतात. तेथे कधी डॉक्टर तर कधी औषधे नसतात अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आठवडाभरापूर्वी नेरळ परिसरातील माणगाववाडी येथील पाच वर्षांच्या बालकाला विंचू चावला असता त्याला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतु येथे त्यावेळी डॉक्टर आणि नर्स नसल्याने त्याला कर्जत येथील रुग्णालयात न्यावे लागले, अशी परिस्थिती या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. सायंकाळी पाचनंतर शिवाई व्यतिरिक्त कोणीही या रुग्णालयात नसते. त्यामुळे रात्री येणाºया रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नाही. यासाठी लवकरात लवकर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
पावसाळा जवळ आल्याने सर्पदंश, विंचूदंश, तसेच अनेक लसीकरण व आजारांसाठी लस किंवा औषधे असणे आवश्यक आहे. तसेच प्रसूतीसाठी आणि शवविच्छेदनासाठी एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता आहे, याची ही कमतरता या रुग्णालयात असल्याने बाहेरून डॉक्टर मागवावे लागतात.
अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे आणि त्यामुळे आलेल्या रुग्णांना उपचार न घेता खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे भास्कर तरे यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २४ तास कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.