कायमस्वरूपी पोषण व पुनर्वसन केंद्रे सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:16 AM2018-05-25T04:16:06+5:302018-05-25T04:16:06+5:30
कर्जत तालुक्यात ग्राम बाल पोषण केंद्रे (व्हीसीडीसी) व पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) कायमस्वरूपी सुरू करण्यात येतील,
अलिबाग : कर्जत तालुक्यात सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आणि विविध शासकीय विभागाच्या समन्वयातून राबवण्यात आलेली आणि यशस्वी झालेली कुपोषणमुक्त कर्जत मोहीम ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र राबवण्यात आणि त्याच बरोबर कर्जत तालुक्यात ग्राम बाल पोषण केंद्रे (व्हीसीडीसी) व पोषण पुनर्वसन केंद्रे (एनआरसी) कायमस्वरूपी सुरू करण्यात येतील, अशी घोषणा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी नेरळ येथे बोलताना केली आहे.
दिशा केंद्र (कर्जत) आणि प्रगती संस्था (चवणे) या दोन सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहयोगाने गेल्या २५ एप्रिलपासून कर्जत तालुक्यात आयोजित कुपोषणमुक्त कर्जत मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या मोहिमेच्या समारोपानिमित्त नेरळ येथील शेतकरी भवनात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे, महिला बालकल्याण सभापती उमा मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, सहायक आदिवासी प्रकल्प अधिकारी डी. डी. काळपांडे, कर्जतच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, कर्जत तालुक्यात ज्या पद्धतीने आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास व महसूल विभागाचा समन्वय घडवून आणला गेला, तसाच समन्वय सर्व तालुक्यांत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना केली जाईल आणि या विभागीय समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्य व महिला, बाल विकास विभागाचे विशेष अभिनंदन करून, या यशस्वी मोहिमेचा एकत्रित अहवाल (डाक्युमेंट) कर्जत उपविभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड यांनी तयार करून जिल्ह्याला सादर करावा, ज्याच्या आधारावर ही मोहीम जिल्हाभर राबवली जाऊ शकेल, असे त्यांनी अखेरीस सांगितले.
कुपोषण होऊ नये, यासाठी जनजागृती
कर्जत तालुक्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रत्येक प्राथमिक केंद्रांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांमधील कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता, तसेच एड्स, टीबी या आजारांच्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कुपोषणाच्या सामाजिक कारणाचा ऊहापोह करून भविष्यात कुपोषण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती या वेळी करण्यात आली.
कुपोषणमुक्त कर्जतचा नागरिकांना लाभ
कुपोषणमुक्त कर्जत मोहिमेत एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ३३५ अंगणवाड्यांमधील दोन हजार ३०० नागरिकांनी लाभ घेतला आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी नेरळमधील उद्योजक भगवान चंचे, नेरळचे तलाठी एच. एन. सरगर, दिशा केंद्र व प्रगती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे या मोहिमेचे मुख्य समन्वयक दिशा केंद्राचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी सांगितले.