वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:29 AM2019-04-03T03:29:53+5:302019-04-03T03:30:22+5:30
वीर घाडगे यांना १० जुलै १९४४ मध्ये वीर मरण आले होते.३ मार्च १९४५ रोजी लाल किल्ला येथे यशवंतरावांची पत्नी लक्ष्मीबाई यांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आला होता.
अलिबाग : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, वीर पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने तहसीलदार आयरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत, याविषयी विचारणा करण्यास सांगितले होते. वीर पत्नी लक्ष्मीबाई या १०० वर्षांच्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सोमवारी प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन त्यांची व्यवस्थित विचारपूस केली व वैद्यकीय उपचार मिळत आहेत किंवा नाही ते पाहिले. सध्या त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. लक्ष्मीबाई यांना स्मृतिभंशाचा आजार असून सध्याचे उपचार पुरेसे आणि योग्य आहेत, असे त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाइकांनी सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना १३ हजार २५० निवृत्तीवेतन आणि मुख्यमंत्री निधीतून तितकेच म्हणजे १३ हजार २५० असे एकूण २६ हजार २५० रुपये मासिक वेतन मिळते, यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माणगावातील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांचे स्मारकदेखील धूळ खात नसून ते सुस्थितीत आहे, या ठिकाणी त्यांचा जन्मोत्सवदेखील व्यवस्थित पार पडतो, अशी माहिती तहसीलदार आयरे यांनी या वेळी दिली.
वीर घाडगे यांचा विवाह १९३७ मध्ये झाला होता. मात्र, त्यानंतर महायुद्धाचे वारे वाहू लागल्यावर ते इंग्रजाच्या बाजूने लढण्यासाठी कुटुंबाची पर्वा न करता मराठा लाइट इन्फंट्रीत रुजू झाले. १० जुलै १९४४ मध्ये समोरच्या जर्मन सैन्यावर आपल्या तुकडीसमवेत चाल करून गेले असता त्यांना वीर मरण आले होते. शरीराची चाळण झाली असतानादेखील शत्रूवर सतत गोळीबार करून त्यांनी आपल्या सैन्याचा मार्ग मोकळा केला होता.