अखत्यारीत नसलेल्या रस्त्याखाली केबल टाकण्यास नगरपंचायतीने दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:53 AM2020-12-14T00:53:45+5:302020-12-14T00:53:48+5:30
१८ लाखांचे आकारले शुल्क; म्हसाळा शहरातील लोणेरे-श्रीवर्धन मार्गावर काम
म्हसळा : नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या म्हसळा शहरातील लोणेरे-श्रीवर्धन मार्गावर वोडाफोन आयडिया या खासगी कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी चक्क नगरपंचायतीने १८ लाख २४०० रुपये घेऊन परवानगी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गुरुवारी रात्री बाजारातील मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू असताना शहरातील नागरिकांनी या खोदकामाबद्दल माहिती घेतली असता हे काम वोडाफोन आयडिया या कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी सुरू आहे असे कंत्राटदाराने सांगितले. मात्र केबल टाकण्याचे काम रस्त्याचा बाजूने न करता रस्ता खोदून सुरू असल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी त्या कामाला विरोध करून काम थांबवले. मात्र, कंत्राटदाराने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, याच वेळी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता श्रीकांत गणगणे यांनी स्वतः येऊन हे काम बेकायदा असल्याचे सांगत थांबवले. कंत्राटदाराने मी १८ लाख रुपये नगरपंचायतीला भरले असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता गणगणे यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे, नगरपंचायतीला परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत काम थांबवले. नाही तर गुन्हा दाखल होईल असे कंत्राटदाराला सांगून केबलसाठी होणारे खोदकाम थांबवले.
कामाला संरक्षण शहरातील रस्ता खोदून फायबर केबल टाकण्याच्या बेकायदा कामाला संरक्षण देण्यासाठी म्हसळा पोलिसांचा फौजफाटा उभा होता. शहरातील नागरिकांचे म्हणणे सोडून पोलीस कंत्राटदाराचे ऐकत होते. यामुळे शहरातून पोलिसांविरोधात नाराजीचा सुर उमटू लागला आहे.