महाड : कोरोना आणि जागेच्या वादामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे सुरू करण्यास परवानगी देणारे आदेश महाड न्यायालयाने दिले आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रायगड रोपवे बंद होता. दरम्यानच्या काळात हिरकणी वाडी येथील औकिरकर कुटुंबाने रोपवेच्या जागेवर दावा सांगत रोपवे बंद केला होता. त्याविरोधात रोपवेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जोग इंजिनीअरिंग कंपनीने महाड न्यायालयात दाद मागितली होती.
रायगड जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्थळे खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर रायगडवर येणाऱ्या पर्यटक शिवभक्तांची रोपवेअभावी गैरसोय होऊ लागली. याच मुद्द्यावर जोग इंजिनीअरिंग कंपनीने रोपवे सुरू करण्यास परवानगी मागणारी याचिका महाड न्यायालयात केली होती. रोपवेच्या जागेसंदर्भात न्यायालयात जो वाद सुरू आहे त्याचा जो काही निकाल लागेल तो आम्हाला मान्य राहील. मात्र तोपर्यंत शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रोपवे सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रोपवेतर्फे न्यायालयात करण्यात आली होती. हाच मुद्दा विचारात घेऊन न्यायालयाने रोपवे सुरू करण्याचे आदेश दिले. रोपवेच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारचे अडथळे आणू नयेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.