करंजा मासळी बाजार सुरू करण्याची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:23 AM2020-10-10T00:23:14+5:302020-10-10T00:23:37+5:30
मत्स्यव्यवसाय विभागाचे लेखी पत्र; उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबईतून मासेविक्री करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना बंदी
उरण : उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थीतुन उरणातील विविध मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चेनंतर स्थानिक मच्छीमारांमध्ये सकारात्मक तोडगा निघाला.
उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्याची लेखी परवानगी काही अटींवर गुरुवारी देण्यात आली. यामध्ये उत्तन, वसई, वर्सोवा, मुंबई परिसराबाहेरून मासळी विक्री करण्यासाठी येणाºया वाहनांना बंदी घातली आहे. करंजा, मोरा येथील मासेमारी नौकांवरील घाऊक व लिलाव पद्धतीने मासळी विक्रीसाठी सकाळी ५ ते ८ आणि दुपारी २ ते ८ वाजेपर्यंतची वेळ आहे. किरकोळ मासळी विक्रीसाठी गावपातळीवर निर्णय घेण्याची मुभा आहे.
स्थानिक मच्छीमारांमध्येच उफाळून आलेल्या वादातून महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने ५ आॅक्टोबर रोजी मच्छीमारांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त महेश देवरे यांच्या दालनात या वादावर तोडगा काढून बंद करण्यात आलेला मासळी बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलोसे आणि सरचिटणीस किरण कोळी, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, ठाणे-पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, उल्हास वाटकरे, करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, उपाध्यक्ष नरेश कोळी, मोरा मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक मच्छीमार सहभागी झाले होते. या निर्णयामुळे परिसरातील २,५०० मच्छीमारांचा प्रश्न मिटला आहे.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीची मध्यस्थी
उरण परिसरातील मच्छीमारांना करंजा टर्मिनल अॅण्ड लॉजिस्टिक बंदराच्या बाजूच्या खाडीत मासळी उतरवून विक्री करण्यासाठी करंजा मच्छीमार संस्थेने परवानगी मागितली होती.
त्याची दखल घेत रायगडचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त एस.आर.भारती यांनी १०० मच्छीमार बोटींसाठी काही अटीशर्तीवर मासे विक्रीस तत्काळ परवानगीही दिली होती.
मात्र, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेली परवानगी बेकायदा असल्याचे सांगत उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या तक्रारीनंतर मासळी बाजार बंद करण्यात आला होता.
मासळी बाजार अचानक बंद झाल्यामुळे सुमारे परिसरातील २,५०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले होते. मात्र, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मध्यस्थीमुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे.