अलिबाग - ‘अलिबागसे आया है क्या’ या वाक्यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र ठाकूर यांच्या वतीने अॅड. रघुराज देशपांडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. ‘अलिबाग से आया है क्या’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा अद्यापही सोक्षमोक्ष लागलेला नाही.सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिकांमधून प्रचलित झालेले काय रे अलिबागवरून आला आहेस का? हे वाक्य तू मूर्ख आहेस का? या आशयाने वापरले जात असल्याने विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारे आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.कान्होजी आंग्रे, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, यासारख्या अनेक थोर व्यक्ती अलिबागमध्ये होऊन गेल्या असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खासगी उद्योगधंदे, प्रकल्प हे अलिबागचे महत्त्व अधोरेखित करतात. सेन्सॉर बोर्डाला कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशाप्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत केली गेली आहे.ठोस पावले उचलावीतएखाद्या व्यक्तीला का रे अलिबागहून आलास का? असे हिणवून अलिबागवासीयांचा अवमान केला जात आहे, असा आरोप करून या वाक्याविरोधात बीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काही तरी ठोस पावले उचलावीत, या मागणीची याचिका दाखल केली गेली आहे.
‘अलिबागसे आया है क्या’वाक्यावर बंदीसाठी न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:15 AM