- सिकंदर अनवारेदासगाव : महाडमध्ये गेली दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. महाड शहरालगत जवळपास पाच पेट्रोल पंप आहेत, यापैकी एकाच पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने या पंपावर चालकांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल टंचाईबाबत कंपनीतील तांत्रिक बिघाडाचे कारण पंप चालकांकडून सांगण्यात आले. यामुळे चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.महाड शहराजवळ एकूण पाच पेट्रोल पंप आहेत. पैकी एक पंप महामार्ग रु ंदीकरणात बाधित झाला आहे. उर्वरित पंप सुरू आहेत. दोन दिवसांपासून महाडमधील या चारही पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावण्यात येत आहेत. यातील एकाच पंपावर पेट्रोल उपलब्ध असल्याने याठिकाणी वाहनचालकांनी एकच गर्दी केली होती. रंगपंचमीचा दिवस असल्याने प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असल्याने पेट्रोल भरताना अनेकदा वाद देखील होत होते. महाड हे मुंबई-गोवा महामार्गावरील मध्य केंद्र असल्याने वाहनचालक थेट महाडला येवून थांबतात. शिवाय महामार्गावर होळीचा सण आटोपून पुन्हा मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या देखील अधिक होती. पेट्रोल नसल्याने एकच पंपावर वाहनचालकांना रांगेत उभे राहावे लागले. पेट्रोलच्या कमतरतेमुळे वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले होते. याबाबत विचारणा केली असता कंपनीतून पेट्रोल आणण्यास गेलेल्या गाड्या भरल्या गेल्या नसल्याचे कारण देण्यात आले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहन चालकांचे मोठे हाल झाले. शिवाय महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार देखील याच पंपावरून कामावर ये-जा करीत असतात. त्यांचे देखील या पंपावरील रांगेत उभे राहावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
महाडमध्ये पेट्रोल टंचाई ; चारपैकी एकाच पंपावर पेट्रोल उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:13 AM