उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टरांची पाठ; कर्जतमधील विदारक सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:04 AM2020-01-03T01:04:21+5:302020-01-03T01:04:24+5:30

एमबीबीएस डॉक्टरांना अपेक्षेपेक्षा कमी मानधन मिळत असल्याने सेवा देण्यास नकार

Physician lessons to sub-district hospitals; Divisible Truth in Debt | उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टरांची पाठ; कर्जतमधील विदारक सत्य

उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टरांची पाठ; कर्जतमधील विदारक सत्य

Next

- विजय मांडे 

कर्जत : शासनाकडून शासकीय रुग्णालयांमध्ये रुजू होणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला सुरुवातीस जेमतेम ४५ हजार इतके मानधन तर काहींना श्रेणीनुसार थोडे जास्त मानधन मिळते. मात्र, डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा ते मानधन फारच कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे; त्यामुळे ते कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास तयार होत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयाबाबत कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी ‘आपले सरकार वेब पोर्टल’च्या माध्यमातून माहिती विचारली होती, त्या वेळी उत्तर देताना, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण आठ पदे मंजूर असून, पाच वैद्यकीय अधिकारी व एक दंत शल्यचिकित्सक अशी सहा पदे भरलेली आहेत व दोन पदे रिक्त आहेत. एमबीबीएस डॉक्टर हे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे येण्यास तयार नाहीत. एमबीबीएस डॉक्टरांना देण्यात येणारे मानधन फक्त ४५ हजार असल्याने डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे ते डॉक्टर शासन सेवेत यायला उत्सुक नाहीत. परिणामी, वैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाही, असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अजित गवळी यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टर मिळणार की नाही, असा प्रश्न कर्जतकरांना पडला आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० बेडचे कर्जत उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र, सध्या स्थितीत त्यातील किती बेड शिल्लक आहेत हा विषयच वेगळा. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे अपघातातील जखमींनाही येथे आणले जाते. तसेच कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण मार्गावरील अपघातातील जखमींना येथे उपचारासाठी आणले जाते. मात्र, अद्ययावत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना या उपजिल्हा रुग्णालयात उपचार न करताच, पुढे हलविण्याचा सल्ला देऊन उपस्थित डॉक्टर जबाबदारी ढकलतात. त्यामुळे संबंधित रुग्णाला पनवेल, मुंबई येथील रुग्णालयात न्यावे लागते. यामध्ये वेळ जात असल्याने प्रसंगी रुग्णाच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते.

तालुक्यात १७० पेक्षा अधिक गावे
पावसाळ्यात धरणात बुडालेले, धबधब्या वरून पडलेले, गिर्यारोहण करताना घसरून पडलेले असेही रुग्ण येथे येतात. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांअभावी तात्पुरते प्राथमिक उपचार करून त्यांनाही पुढचा रस्ता दाखवण्यात येतो.
तालुक्यात सुमारे १७० पेक्षा अधिक गावे, वाड्या, पाडे आहेत. उपजिल्हा रुग्णालय सुरू झाले, तेव्हा सगळ्यांना येथे मोफत चांगले उपचार मिळतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती.
मात्र, डॉक्टरांची रिक्त पदे, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी आदी सुविधांची उणीव, औषंधाचा अपुरा पुरवठा यामुळे होतो त्रास.

एमबीबीएस डॉक्टरांना अधिक मानधनाची अपेक्षा असते. ती पूर्ण होत नसल्याने ते रुजू होण्यास तयार होत नाहीत आणि उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करू नये, असे शासकीय धोरण असल्याने पदे रिक्त राहतात. मात्र, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्यकेंद्रात बीएएमएस डॉक्टरांची पदे भरून उणीव भरून काढली आहे.
- डॉ. अजित गवळी, शल्य चिकित्सक,
जिल्हा रुग्णालय, अलिबाग

वैद्यकीय अधिकारी कमी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय अधिकारी यांच्यावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण पडतो व मनुष्यबळ कमी असल्यामुळे रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा देणे इच्छा असूनही शक्य होत नाही

मी, आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे डॉक्टरांच्या रिक्त पदाबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यावर अधिक मानधनाभावी डॉक्टर रुजू होत नाहीत, असा लेखी खुलासा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तरी शासनाने यावर योग्य ती सकारात्मक पावले उचलून उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची नेमणूक करावी.
- पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत

Web Title: Physician lessons to sub-district hospitals; Divisible Truth in Debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.