आविष्कार देसाई /अलिबागजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून उमेदवारांना माघार घेण्याची सोमवारी शेवटची संधी आहे. युती आघाडीतील उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्या-त्या पक्षप्रमुखांसमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणांगणावर वेगळेच चित्र उमटणार आहे. त्यामुळे शिवतीर्थावर सत्ता बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याने सत्ता हस्तगत करण्यासाठी कोण किती पाण्यात आहे. हे रायगडकरांना कळणार आहे.निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे, तर काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांनी काही ठिकाणी सोयीस्कर आघाडी केली आहे. अलिबाग, कर्जत आणि पेण तालुक्यांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत घरोबा केला आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यांत काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. काँग्रेसने अलिबागमध्ये काही ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. शेकाप राष्ट्रवादीनेही एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रोहे तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तेथे शेकापने उमेदवार उभे केले आहेत. खामगावमधून शेकापने आस्वाद पाटील यांना राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात शेकापच्या राजश्री सानम या अपक्ष म्हणून आहेत. अलिबाग तालुका हा शेकापचा गड मानला जातो. येथेही राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत, त्याचप्रमाणे कर्जतमध्येही कळंब मतदार संघातून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकेरे यांनी शेकापचे अधिकृत उमेदवार सुदाम पेमारे यांच्याविरोधात आव्हान उभे केले आहे. नागोठणेमध्ये राष्ट्रवादीचे नरेंद्र जैन यांना शेकापचे राजेश सानप यांचे आव्हान आहे. सत्तेच्या साठमारीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामुख्याने शेकाप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही आहते. जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाचा उमेदवार हा अध्यक्ष असणार आहे. यासाठी शिवतीर्थावर सत्ता काबीज करण्यासाठी युती आघाड्यांमध्येच लढत असल्याचे दिसून येते. सोमवारी युती आघाड्यांसाठी अडचणींच्या ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घेतली नाही, तर युती आघाडी यांच्यातील बिघाडी अटळ आहे. युत्या आघाड्यांच्या माध्यमातून रायगडच्या राजकारणात सत्तेचे साकारलेले चित्र फिके झाले, तर सत्तेची समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.
राजकीय लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट
By admin | Published: February 13, 2017 5:13 AM