- प्रकाश कदमपोलादपूर : पोलादपूर येथील रहिवासी असलेली आणि पुण्याच्या आबासाहेब गरवारे या कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या समृद्धी भूतकर हिने नेपाळ येथील १५,००० फूट उंचीवरील पिकी शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले. यापूर्वी समृद्धीने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी १७,५०० फूट उंचीवरील फ्रेंड्सशिप शिखर सर करून सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा विक्रम केला होता.एव्हरेस्ट बेसकॅम्पसह हिमालयातील इतर सहा शिखरे व चार हिमालयीन मोहिमांचे तिने यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. तसेच गेल्या सहा वर्षात सह्याद्रीतील ऐतिहासिक अभ्यासाच्या शोधमोहिमा व अनेक गड-किल्ल्यांवर भटकंती आणि रायगड व प्रतापगड प्रदक्षिणा असा प्रवास तिने गिर्यारोहण क्षेत्रात केला आहे. समृद्धीच्या या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी, संघटनेने, व शासकीय स्तरावर तिला सन्मानित केले आहे.तिरंगा फडकावलापुणे येथील गिर्यारोहण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गिरिप्रेमी संस्थेबरोबर सहभागी होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पोलादपूर ते काठमांडू असा प्रवास केला. आपल्या सहकाऱ्यांबरोबरच काठमांडू ते जिप्रो असा प्रवास केला, तो मार्ग अतिशय खडतर असून धोकादायक आहे. हा खडतर प्रवास करताना तिला ढगाळ वातावरण व हिमवर्षावाला सामोरे जावे लागले. यावर मात करून तीन दिवसांनंतर दुपारी साडेबारा वाजता तिने पिकी शिखरावर पाय ठेवून भारताचा तिरंगा फडकविला आणि सहभागी सदस्यांसहित ‘भारतमाता की जय’ असा जयघोष केला. या मोहिमेत हेतल अगसकर, समृद्धी भूतकर, प्रशांत भूतकर, भोलाराम शेर्पा, चिरी शेर्पा यांनी सहभाग घेतला.
समृद्धीने केले हिमालयातील पिकी शिखर सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:23 AM