कर्जत स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:15 AM2019-10-09T00:15:12+5:302019-10-09T00:15:33+5:30
कल्याणकडून कर्जतकडे येणारा रस्ता कर्जत चारफाटा येथून कर्जत स्टेशनकडे जातो.
- विजय मांडे
कर्जत : कर्जत-कल्याण रस्त्याचा भाग असलेल्या कर्जत स्टेशनकडे जाणारा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. नगरपालिका हद्दीत असलेल्या भिसेगाव रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. याबाबत भिसेगावमधील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी तर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली गेली नाही तर कर्जत-कल्याण रस्त्याचे काम थांबविण्याचाइशारा दिला आहे.
कल्याणकडून कर्जतकडे येणारा रस्ता कर्जत चारफाटा येथून कर्जत स्टेशनकडे जातो. कर्जत शहरात असलेले बहुतेक रस्ते पालिकेकडून पाठपुरावा केल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले गेले आहेत. मात्र, त्यात भिसेगाव-कर्जत चारफाटा हा रस्ता आजही खड्ड्यात हरवला असून या रस्त्यावर डांबर आहे की नाही? हे शोधण्याचे काम करावे लागेल, कारण आम्ही अनेक वर्षे मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने ५०० मीटरचा रस्ता हस्तांतर केला नाही. त्यामुळे आम्हाला करता येत नाही, अशी खंत स्थानिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक बाळाजी विचारे यांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याबद्दल ग्रामस्थ आणि नागरिक आक्रमक आहेत, कारण या रस्त्यावरील खड्डे भरण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. कर्जत पालिका स्थापन झाल्यानंतर पूर्वी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेले अनेक रस्ते पालिकेच्या मालकीचे झाले आहेत. त्या बहुतेक सर्व रस्त्यावर काँक्रीटचे नवीन रस्ते बनले आहेत; पण त्यात कर्जत चारफाटा-भिसेगाव हा कर्जत स्टेशनकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने वर्ग केला नसल्याने कर्जत नगरपालिकेला हा रस्ता काँक्रीटचा करता आला नाही.
रस्ता हस्तांतर न केल्याने आणि बांधकाम विभाग त्या रस्त्यावर खड्डे भरत नसल्याने स्थानिक नागरिकांंच्या आग्रहास्तव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी खडी उपलब्ध करून दिली आणि रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे भरले होते. आता तर रस्त्याची अवस्था आणखी बिकट असल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या या ५०० मीटरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच रस्त्याच्या २३ किलोमीटरचा भाग डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी शासनाने कोट्यवधीचा निधी मंजूर केला आहे. असे असताना भिसेगाव ते कर्जत चारफाटा या
५०० मीटर अंतरावर साधे खड्डे भरण्याचे कामही केले नाही. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत
आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
या रस्त्याने आधी कर्जत स्टेशन आणि नंतर पुढे एसटी आगार हा रस्ता पोहोचत असून त्या रस्त्यावरून शासनाची अनेक वाहने धावतात. तरीदेखील रस्त्याची दुरुस्ती होणार नसेल तर आम्ही रस्त्याच्या केवळ दुरुस्तीसाठी आंदोलन करणार आहोत.
दिवाळीपूर्वी कर्जत चारफाटा ते भिसेगाव हा ५०० मीटरचा रस्ता दुरुस्त झाला नाही तर सर्व नागरिक कर्जत-कल्याण रस्त्याचे सुरू असलेले काम बंद पाडू, असा इशारा स्थानिक रहिवासी यांच्या वतीने कार्यकर्ते उज्ज्वला धनगर आणि मोहन भोईर यांनी दिला आहे.
- भिसेगाव ते कर्जत चारफाटा या ५०० मीटर अंतरावर खड्डे भरले नाही. या रस्त्याची अवस्था ही बिकट झाल्याने कर्जत एसटी आगाराकडे जाणारा हा रस्ता असल्याने त्याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
कर्जत स्टेशनकडे येणारा हा रस्ता महत्त्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव असून पावसाळा संपला की, तत्काळ दुरुस्त केला जाईल.
- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
आम्ही कर्जत शहरातील अनेक रस्ते काँक्रीटचे केले, त्या वेळी कर्जत स्टेशनकडे येणारा रस्ता पालिकेकडे वर्ग केला नाही म्हणून करता आला नाही. त्यामुळे आधी बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि येणाºया पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- बाळाजी विचारे, माजी नगरसेवक
कर्जत पालिका रस्त्याची कामे करण्यात आघाडीवर असलेली नगरपालिका आहे. त्यामुळे काँक्रीटीकरण होऊन चांगला रस्ता तयार झाला असता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाची ही भूमिका दुटप्पी असून ते आम्हाला रस्ता वर्ग करीत नाहीत आणि स्वत:देखील बनवत नाहीत, हे अगदी चुकीचे धोरण आहे.
- सोमनाथ ठोंबरे, नगरसेवक