नवनगर वसाहतीच्या जागी नाणारची चर्चाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 05:01 AM2019-03-06T05:01:41+5:302019-03-06T05:01:52+5:30

शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे नाणार येथून हटविण्यात आलेला प्रकल्प रायगड जिल्ह्यात येण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी त्यासाठी एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही.

At the place of colonization, Navanagar will discuss the issue | नवनगर वसाहतीच्या जागी नाणारची चर्चाच

नवनगर वसाहतीच्या जागी नाणारची चर्चाच

Next

अलिबाग : शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे नाणार येथून हटविण्यात आलेला प्रकल्प रायगड जिल्ह्यात येण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी त्यासाठी एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. ज्या सिडकोने जमीन संपादित करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे, त्यांनाही ४० गावांच्या जागेवर रिफायनरी आणण्याबाबत कोणतेही आदेश किंवा सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिली.
रोहा, अलिबाग आणि मुरु ड तालुक्यातील ४० गावांतील जमिनीवर नवनगर एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यासाठी सिडकोने १९ जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध केली. नवनगर एकात्मिक औद्योगिक वसाहतीच्या नियोजनाची जबाबदारी सिडकोकडे आहे. त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेस खूप वेळ लागेल. तेथील एक इंचही जमीन सद्य:स्थितीत संपादित केली नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जमीन अधिग्रहणासाठी मुख्यमंत्र्यांना आवश्यक ते सहकार्य दिल्याचीही चर्चा यानिमित्ताने होती, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना विचारता, माझी अशा विषयात मुख्यमंत्र्यांशी चर्चाही झालेली नाही. सिडकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोलून, माहिती घेऊन मी प्रतिक्रिया देईन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थही अनभिज्ञ
सिडकोच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असलेल्या या नवनगर वसाहतीबाबतही रोहा, अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील संबंधित ४० गावांतील ग्रामस्थांना कोणतीही कल्पना नसल्याची माहिती या गावांतील एक सामाजिक कार्यकर्ते सतीश लोंढे यांनी दिली. ही अधिसूचना सिडकोने १९ जानेवारीला प्रसिद्ध केली. रोहा तालुक्यातील २१, अलिबाग तालुक्यातील ८, मुरुड तालुक्यातील १० आणि श्रीवर्धन तालुक्यातील एक अशा ४० गावांतील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित वसाहतीचा नकाशा, आक्षेप व सूचनांकरिता उपलब्ध करून दिल्याचे तसेच ३० दिवसांत आक्षेप व सूचना दाखल करण्याचे त्यात म्हटले होते. परंतु सव्वा महिना उलटूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह कोणत्याही कार्यालयात त्याचा तपशील उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यासाठी ६ फेब्रुवारीला जिल्हा नगररचना आणि मूल्यनिर्धारण कार्यालयाला पत्र दिल्यावर हा नकाशा आमच्याकडे नसल्याने त्याची प्रत देता येत नसल्याचे नगररचना साहाय्यक संचालक हे. रा. ठाकूर यांनी त्यांना कळविले.
>नवनगरात समाविष्ट गावे
रोहा : (२१) - खोपे, सारसोली, तळवडे, खैराळे, खारखर्डी, महाळुंगे, नवखार, दीव, दापोली, धोडखार, धोंडखार उमटे, शेडसई, न्हावे, शिळोशी, सोनखार, कोकबन, खुटल, चांगगाव, कजरविरा, आंबिवली, धगडवाडी.
अलिबाग : (०८) - भोनंग, रामराज, सुडकोली, कुंदे, ताजपूर, मालाडे, नवखार, तळवली.
मुरूड - (१०) तळे, तळेखार, सावरोली, चोरढे, वळके, सातीर्डे, शिरगाव, येसदे, तडगाव, आमली. श्रीवर्धन : (०१) वारळ.

Web Title: At the place of colonization, Navanagar will discuss the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.