वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: खारघर टेकडीवर झोपडपट्टी वसविण्याचा डाव पनवेल महानगरपालिकेने उधळला आहे.दि.15 रोजी बेलपाडा आदिवासी वाडी परिसरात खारघर टेकडीवर वाढत चाललेल्या जवळपास 75 बेकायदा झोपडयांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.
जेसीबीच्या सहाय्याने या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या.मजूर वर्गाला हाताशी धरून काही स्थानिकांनी याठिकाणी हि झोपडपट्टी वसवली होती.यामध्ये आर्थिक व्यवहार देखील झाल्याची चर्चा आहे.प्रभाग अ समितीचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या नेतृत्वात हि कारवाई करण्यात आली.काही महिन्यापूर्वी हळू हळू या झोपड्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिदर्शनास येताच पालिकेने सोमवारी हि कारवाई केली.यावेळी झोपडपट्टी वासियांनी या कारवाईला विरोध करण्याचा देखील प्रयत्न केला.
पालिका क्षेत्रात झोपडपट्टी माफिया काही झोपडपट्टी धारकांना हाताशी धरून अनेक ठिकाणी झोपडपट्टी विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.एकीकडे लोकसभेची आचारसंहिता सुरु असल्याने प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने झोपडपट्टी माफिया सक्रिय झाले आहेत.खारघर मध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाकडे सिडकोचे देखील दुर्लक्ष होत आहे.