नियोजित वस्तू, सेवा कर त्रासदायक
By Admin | Published: January 28, 2017 02:57 AM2017-01-28T02:57:48+5:302017-01-28T02:57:48+5:30
नियोजित वस्तू व सेवा कर कायद्यातील विवरण पत्र दाखल करणे, कर प्रदान करणे, नोंदणीची मर्यादा आदी तरतुदी लहान व छोटे व्यापारी व व्यावसायिक
अलिबाग : नियोजित वस्तू व सेवा कर कायद्यातील विवरण पत्र दाखल करणे, कर प्रदान करणे, नोंदणीची मर्यादा आदी तरतुदी लहान व छोटे व्यापारी व व्यावसायिक यांच्यासाठी अतिशय किचकट व त्रासदायक आहेत. तसेच या कायद्यातील नोंदणी घेण्यासाठीची २० लाख रु पये मर्यादा व कोम्पोजीशन योजनेखाली ठेवलेली ५० लाखांची मर्यादा तुटपुंजी आहे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल संजय राऊत यांनी केले आहे.
अलिबाग तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जेएसएम कॉलेज अलिबाग येथील जयंत केळुस्कर सभागृहात बुधवारी ‘नियोजित वस्तू व सेवा कर’ या विषयी आयोजित परिसंवादात राऊत बोलत होते. अलिबागमधील व्यापारी व व्यावसायिकांना या कायद्यातील तरतुदी व प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये जीएसटी कशाला लागणार, नोंदणी कोणाला घ्यावी लागणार, नोंदणी कशी मिळेल, विवरण पत्र कोणती, किती व कशी व कधी दाखल करावयाची, कर कसा भरायचा, सेट आॅफ कसा घ्यायचा व मिळेल आदी विषयांवर यामध्ये माहिती देण्यात आली. या परिसवांदात सनदी लेखापाल संजय राऊत व मनोज दुर्गवळी यांनी या विषयाची माहिती उपस्थितांना सोप्या भाषेत समजावली व त्यांच्या शंकांचे निवारण केले. पाहुण्यांचे स्वागत रायगड जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव भारत जैन यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संदीप जोशी यांनी केले. सुहास वैद्य यांनी नेटके आयोजन केले. याप्रसंगी अलिबाग परिसरातील व्यापारी व व्यावसायिक उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)