वनक्षेत्रात नववर्ष स्वागत पार्टीचा बेत आखताय, मग होऊ शकते कारवाई
By राजेश भोस्तेकर | Published: December 29, 2023 02:58 PM2023-12-29T14:58:40+5:302023-12-29T14:58:51+5:30
वन विभागाची राहणार करडी नजर
अलिबाग : नव वर्ष स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण पार्टीचे बेत आखत आहे. नववर्ष स्वागतासाठी निवांत ठिकाण असलेल्या वनक्षेत्रात पार्टीचे बेत आखत असाल तर सावधान तुमच्यावर वन विभागाची करडी नजर राहणार आहे. वनक्षेत्रातील गडकिल्ले, समुद्रकिनारी कांदळवनक्षेत्र किंवा त्याचे लगत, वनक्षेत्रातील शासकीय निवासस्थाने व प्रत्यक्ष वनक्षेत्रांत पार्टी करताना आढळल्यास वन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वन क्षेत्रातली पार्टीचे बेत करून कायद्याच्या कचाट्यात अडकू नका. ३१ डिसेंबर रोजी अनियमितता घडणा-या घटनांवर गस्त घालून बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उपवनसंक्षक अलिबाग राहुल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
३१ डिसेंबर २०२३ वर्ष अखेरीस व नविन वर्षाचे स्वागतासाठी वनक्षेत्रातील गडकिल्ले, समुद्रकिनारी कांदळवनक्षेत्र किंवा त्याचे लगत, वनक्षेत्रातील शासकीय निवासस्थाने व प्रत्यक्ष वनक्षेत्रांत पार्टीचे पर्यटकांकडुन नियोजन करण्यांत येते. अशा ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणे, धुम्रपान, नशापाणी करणे व त्यामुळे वनक्षेत्रांत वणवे लागणे, रात्री उशिरा पर्यंत मोठया प्रमाणावर गाणी वाजवणे, इत्यादीमुळे वन्यप्राण्यास त्रास होणे अशा घटना घडत असतात. अशा घटना टाळणे साठी वन विभाग हा सज्ज झाला आहे.
अलिबागचे उपवनसंक्षक राहुल पाटील, यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले सर्व वनपरीक्षेत्र अधिकारी, कर्मचारी यांना वन क्षेत्रात ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास
अनियमितता घडणा-या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वनकर्मचा-यांना वनक्षेत्रातील गस्त वाढविण्याच्या सुचना देऊन, अनियमितता आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
३१ डिसेंबर २०२३ रोजी वर्ष अखेरीस व नविन वर्षाचे स्वागत करण्यामध्ये अतिउत्साही पर्यटकांकडुन कोणतिही अनियमितता घटना घडू नये, या करीता राहुल पाटील, उपवनसंरक्षक अलिबाग यांनी सर्व क्षेत्रीय वन अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत वनक्षेत्रांत कोणतीही अनियमीतता घडणार नाही, याची दक्षता घेऊन त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणेसाठी हिरिरीने पुढाकार घेतला आहे.