पाण्यासाठी नियोजनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:06 PM2019-05-24T23:06:58+5:302019-05-24T23:07:08+5:30
बोअरवेल फेल : महाड तालुक्यातील पिण्याची पाणी योजना प्रस्तावित; टंचाईची झळ
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाई जाणवलेल्या गावांत पुन्हा यावर्षीही पाणीटंचाई जाणवल्याने प्रशासन सज्ज झाले. प्रतिवर्षी पाणीटंचाई आणि पाणी या प्रश्नांवर लाखो रुपये खर्च केले जात असले, तरी ठोस उपाय न केल्याने ही टंचाई वर्षानुवर्षे जाणवतच आहे. भूगर्भातील पाणी पातळी आधीच घटली असतानाच बोअरवेलही मारल्या जात आहेत. महाड तालुक्यात यावर्षी जवळपास ६८ बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. गावातील भौगोलिक स्थिती नपाहता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याने पाणी योजना सपशेल फेल ठरत आहेत.
महाड तालुका हा दुर्गम आणि खेडोपाड्यात वसलेला तालुका आहे. या तालुक्यात गेली अनेक वर्षे असलेली पाणीटंचाईची समस्या आजही कायम भेडसावत आहे. वर्षानुवर्षे नवनवे प्रयोग करूनही काही गावातील पाणीटंचाई दूर झालेली नाही, यामुळे या गावात प्रतिवर्षी टँकरने पाणीपुरवठा करणे भाग पडत आहे. महाड पंचायत समिती पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्ची घालत आहे, तर दुसरीकडे याच गावातून पाणी योजनांवरही खर्च टाकला जात आहे. दुर्गम भागात पाण्याचे अन्य स्रोत उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत १२ गावे व ५५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिंपळकोंड, पाचाड गाव व वाड्या, पुनाडे, शेवते, वाकी गावठाण, ताम्हाणे, सापे, साकडी, नेराव, आढी, घुरुपकोंड या गाव व वाड्यांना टंचाईची झळ पोहोचत आहे. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा हाच आधार उरला आहे. पाण्याचा टँकर हा दररोज जात नसल्याने पाणी पुरवून वापरावे लागत असते.
याशिवाय वारंगी गाव व वहूर गावच्या वाड्या अशा एकूण १६ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे तालुक्यात १३ गावे व ७२ वाड्या अशा ८५ ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात असलेली पाणीटंचाई दूर करण्यास योग्य नियोजनाची गरज आहे. याकरिता तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रकल्प पूर्ण झाले तर पाणीटंचाई दूर होईल. टँकरमुक्त अभियान राबवताना तालुक्यातील रखडलेले पाणीप्रकल्प पूर्ण झाले तर तालुका सुपीक होण्यास मदत होणार आहे.
शासकीय योजनांसाठी पाठवलेले प्रस्ताव प्रलंबित
महाडमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता तोरो यांनी आता टंचाईग्रस्त गावात स्वत: पाहणी करून कावले तर्फे विन्हेरे, ताम्हाणे, पिंपळकोंड, किये, पाचाड, कुंभेशिवथर, रावतळी, नडगाव तर्फे तुडील आदी गावात जलस्वराज्य टप्पा-२, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलयुक्त शिवार योजना, या योजनांतून प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, हे सर्व प्रस्ताव प्रलंबित आहेत.
दुर्लक्षामुळे अपयशी
महाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पामुळे किल्ले रायगड परिसर, वारंगी ते बिरवाडी, कोंझर ते महाड हा परिसर पाण्याखाली येणार आहे. विन्हेरे विभागातील आंबिवली धरण, कोथेरी धरण आजही अपूर्ण अवस्थेत खितपत पडून आहेत. यामुळे हे प्रकल्प मार्गी लागणे काळाची गरज आहे. महाड तालुक्यातील पाणीटंचाईवर शासनाच्या पाणलोट, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य आदी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र, या योजना राबवताना तेथील भौगोलिक स्थिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सूचनांकडे केले गेलेले दुर्लक्ष अपयशी होण्यास कारणीभूत ठरले आहे.