स्वच्छता कर भरण्यावरून नगरपरिषद अन् प्रवाशांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:24 AM2018-08-31T04:24:36+5:302018-08-31T04:25:03+5:30
वाहनांच्या लांबच लांब रांगा : वाहतूककोंडीत अडकली अॅम्बुलन्स
अलिबाग : शहरामध्ये प्रवेश करताना अलिबाग नगर परिषदेमार्फत वाहन चालकांकडून स्वच्छता व पर्यावरणविषयक कर आकारण्यात येतो. मात्र काही चालक कर न भरताच शहरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. कर चुकवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वाहन चालकांना तेथील कर्मचारी अडवतात आणि कर भरण्यास सांगतात. त्यावेळी दोघांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार घडतात. बुधवारी १२ वाजण्याच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. या वाहतूककोंडीचा सामना एका रुग्णवाहिकेलाही करावा लागला.
अलिबाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. विशेषत: वीकेंडला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरामध्ये स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी नगर पालिका अलिबागमध्ये येणाºया वाहन चालकांकडून स्वच्छता व पर्यावरण करापोटी दहा रुपये आकारते. कर गोळा करण्यासाठी नगर पालिकेने ठेकेदार नेमलेला आहे. तेथील कर्मचारी हा कर गोळा करण्याचे काम करतात. कर भरल्यानंतर करदात्यांना पावतीही दिली जाते.
अलिबाग-पेण मार्गावरील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल येथे आणि अलिबाग-करुळ मार्गावरील श्रीबाग येथे तसेच ओमबीव्हीएम सिनेप्लेक्स येथे कर गोळा करण्यासाठी बुथ उभारले आहेत. तेथील कर्मचारी कर गोळा करण्याचे काम करतात. परंतु काही चालक कर न भरताच प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. बुधवारी अशाच प्रकारे एका वाहन चालकाने कर न भरताच प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वाहनामध्ये एक महिलाही बसली होती. कर्मचाºयाने वाहन अडवून कर भरण्यास सांगितले. त्यावेळी चालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली. वाहन चालक कर भरण्यास तयार नसल्याने प्रकरण हमरीतुमरीवर आल्याने काही स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही चालकाने जुमानले नाही. त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. दरम्यान, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूककोंडी झाली.
कोंडीचा सामना एका रुग्णवाहिकेला करावा लागला. त्या रुग्णवाहिकेतील लहान मुलाला तातडीने अधिक उपचारासाठी मुंबईला जाणे गरजेचे होते. अखेर स्थानिकांनीच पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेला वाट करून दिली. काही कालावधीनंतर तेथे पोलीस आले. त्यांनी चालकाला कर भरण्यास सांगितले. अलिबाग नगर पालिका स्वच्छता व पर्यावरणविषयक कर गोळा करते. कररूपाने अलिबाग नगर पालिकेच्या तिजोरीत किती रक्कम गोळा होते. कर गोळा करणाºया ठेकेदाराचे नाव, मुदत याची माहिती त्यांनी कर वसुली बुथवर लावणे आवश्यक असल्याचे एका पर्यटकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.