पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:45 AM2019-06-10T02:45:24+5:302019-06-10T02:45:43+5:30
विद्यार्थ्यांचा संदेश : गोळा के ल्या ६० किलो बिया
दत्ता म्हात्रे
पेण : शिक्षण जगतात उन्हाळी सुट्टीच्या सत्रामध्ये विद्यार्थीवर्ग पर्यटनातून झाडांच्या बिया गोळा करून त्या बिया परिसरातील रस्ते, उजाड माळरानात टाकून त्याद्वारे उपजत वृक्षनिर्मिती करण्याचा अनोखा व अभिनव उपक्रम पेणमधील खासगी शाळेचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी गेली चार ते पाच वर्षे सातत्याने राबवित आहेत. यावर्षीही उन्हाळी सुट्टीच्या हंगामात परिसरातील माळरान व वृक्षवनराई भागात निसर्ग पर्यटनातून तब्बल ६० किलो विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत. गोळा केलेल्या बिया पावसाअगोदर ओसाड माळराने व रस्त्याच्या कडेला टाकण्याची लगबग विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे यांची सुरू आहे.
पर्यावरण जनजागृतीसाठी, ‘नेहमीची येतो पावसाळा आणि बियांची परिसरात पेरणी करा’ हा संदेश घेऊन जागोजागीचे गावकरी, शेतकरी, प्रवासी व वृक्षप्रेमी मित्र परिवारांकडे प्रसारित करत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा हा अभिनव प्रयोग वृक्षनिर्मितीसाठी करणे ही अतिशय मोलाची बाब ठरत असल्याने नागरिकांमध्येही या उपक्रमांबाबत चर्चा केली जात आहे.
२0१९ हे वर्ष जागतिक तापमानवाढीचे उच्चांक मोडणारे ठरले आहे. निसर्गाशी समतोल न राखता होणारा विकास हा मानवी संस्कृतीच्या विनाशास कारणीभूत ठरत असल्याच्या अनेक घटना सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहेत. भरमसाठ झालेली जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, अनेक प्रकल्पांसाठी डोंगर फोडून केले जाणारे मातीचे उत्खनन यामुळे झाडांची संख्या कमी होऊन माळराने उजाड होत आहेत. माणूसच पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरलेला आहे. अनेक प्रसंगात मानवाच्या जाणाऱ्या बळींची संख्याही या निसर्गाच्या असमतोलामुळे वाढली आहे. या समस्येवर कायमचा प्रभावी उपाय म्हणजे वृक्षलागवड होय. त्यासाठी पर्यावरण संवर्धन संकल्पना हाती घेऊन राष्ट्रीय हरित सेना उन्हाळी सुट्टीच्या हंगामात अनेक वृक्षांच्या बिया गोळा करण्यासाठी विद्यार्थीवर्ग दिवसभर उन्हातानात आपला छंद जोपासून एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या बियांचे वाटप व बियांची परिसरात पेरणी अशा दोन्ही प्रकारे आपले उद्दिष्ट साध्य करताना दिसत आहे.
या विद्यार्थ्यांनी रेनट्री, करंज, चिंच, काजू, शमी, हादगा, बदाम, जांभूळ, आंबा, बेल व इतर अनेक प्रकारच्या झाडांचे बी गोळा करून आपला परिसर वृक्ष वनराईने समृद्ध व्हावा म्हणून मान्सूनपूर्व बी पेरणीसाठी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
माळरानावर पेरणी
च्विद्यार्थी ही जैवविविधता जोपासण्यासाठी झाडांच्या शेंगा, बी, परिपक्व झालेली फळे यांच्या माध्यमातून मिळालेल्या बी प्रत्यक्ष हातात घेऊन जागोजागी माळरानावर रस्त्याच्या कडेला टाकताना दिसत आहेत.
च्याशिवाय हे बी निसर्गप्रेमी, वृक्षमित्र, शेतकरी, नागरिक यांनासुद्धा मोफत पेरण्यासाठी देण्यात येत आहे. राष्ट्रीय हरित सेनेतील या विद्यार्थी वर्गाला ऋतुमानाच्या कालगणनेनुसार कोणत्या झाडाला कोणत्या ऋतूत कोणती फळे येतात, याचे ज्ञान प्रा. उदय मानकवळे यांनी पर्यावरण शिक्षणातून दिलेले आहे.