प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:36 PM2019-11-20T23:36:07+5:302019-11-20T23:36:11+5:30
दिवेआगारमधील ग्रामसभेत निर्णय; पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी संकल्प
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळ असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतीतर्फे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी घालावी, यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. दिवेआगर ग्रामपंचायतीने मंगळवारी परिसरातील संबंधित ग्रामपंचायत व गणेशमूर्तिकार तसेच कारखानदार यांना एकत्रित निर्णय घेण्यासाठी सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
दिवेआगर व बोर्लीपंचतन येथील समुद्रकिनारी परिसरातील हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. बाजारातल्या बहुतांश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. विसर्जनानंतर त्या विरघळत नाहीत. दुसºया दिवशी मूर्तीचे भग्न अवशेष किनारी पडलेले असतात. त्याची विटंबना होऊ नये व पर्यावरणाचा ºहास थांबवावा, या अनुषंगाने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला दिवेआगर सरपंच उदय बापट, बोर्लीपंचतन सरपंच नम्रता गाणेकर, ग्रामपंचायत सदस्य सायली गाणेकर, भूमी कांबळे, नुजहत जहांगीरदार, संतोष कांबळे, ग्रामसेवक शंकर मयेकर, मूर्तिकार अनिल शिरकर, चंद्रकांत गोविलकर, कांदळवन प्रतिष्ठानचे संदेश अंभोरे, वंदन झवेरी, मोहन उपाध्ये, विराज दाभोळकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत सर्वानुमते चर्चा करून, समुद्रामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या पर्यावरणपूरक निर्णयाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. याशिवाय शाडूच्या मूर्तींची निर्मिती सर्व कारखानदारांनी करावी व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाहेरून आणल्या जातात. त्याच मूर्ती शाडू मातीने येथील कलाकारांनी बनविल्या तर स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळून आपली कला जिवंत राहील व रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असे सुचविण्यात आले.
काही कारखानदारांनी आपल्या अडचणी सभेत मांडल्या, तर काही मूर्तिकारांनी या निर्णयाचे स्वागत केले.
पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनावर बंदी घालून शाडूमातीचा मूर्तीसाठी वापर करून पर्यावरणाचे मोठे नुकसान आपण टाळू या, असा संकल्प दिवेआगार ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे.