अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन
By निखिल म्हात्रे | Published: November 29, 2023 04:56 PM2023-11-29T16:56:49+5:302023-11-29T16:57:28+5:30
मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
अलिबाग - जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यात पावसापासून कसेबसे वाचविलेले पीक खळ्यावर आणून उडवी केलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड बळीराजा करत आहे. त्यामुळे बळीराजाने उडव्यांना प्लास्टिक आच्छादने टाकली असून, पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावले. त्यांनी खळ्यावर रचून ठेवलेले भात, नागली पिकांचे उडवे पावसाने भिजून जाऊ नयेत, म्हणून प्लास्टिकचे आवरण टाकून झाकले आहेत.
अलिबाग तालुक्यात खरीप हंगामातील पिकावर येथील आदिवासींना वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मुसळधार पावसाने भात या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे वाचवले आहे.
धान्य, पेंढा काळा पडण्याची भीती
नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेले पीक खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत. पण, मागील शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही भागात पावसामुळे धान्य तसेच पेंढा काळा पडून कुजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खळ्यावर रचून ठेवलेल्या उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून ठेवले आहे.
मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी आपत्तीतून थोडेफार पीक वाचले आहे. पण, पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. - संदिप कदम, शेतकरी.