प्लॅस्टिकमिश्रीत रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:45 AM2018-08-27T03:45:16+5:302018-08-27T03:46:01+5:30
पनवेल महापालिकेचा प्रयोग फसला : सहा महिन्यांतच रस्ता उखडला; कंत्राटदाराला दिले निर्देश
वैभव गायकर
पनवेल : महापालिकेने मोठा गाजावजा करीत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्याचा प्रयोग केला होता; परंतु महापालिकेचा हा प्रयोग सपशेल फसला आहे. कारण अवघ्या सहा महिन्यांत या रस्त्याची चाळण झाली आहे. प्रयोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक मिश्रणापासून तयार करण्यात आलेला ५०० मीटरच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
पनवेल महापालिकेने सर्वप्रथम प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती. यानंतर राज्यभर प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विविध विक्रेते व दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला होता. २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत २६ फेब्रुवारी २०१८ रोजी आगरी समाज हॉल येथे प्लॅस्टिक मिश्रणातून रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यासाठी जप्त केलेला चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अशाप्रकारे प्लॅस्टिक मिश्रीत डांबरी रस्ता तयार करण्यात आल्याचा दावादेखील पालिकेमार्फ त करण्यात आला होता. या प्रयोगामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढेल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या ५०० मीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेने सर्वप्रथम हा प्रयोग राज्यात सुरू केला होता. प्लॅस्टिक आणि डांबरचे मिश्रण तयार करून यामध्ये ९० टक्के डांबर आणि १० टक्के प्लॅस्टिक पिशव्यांचा समावेश करण्यात आला होता. पनवेल महापालिकेने आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या अंतरात हा रस्ता तयार केला होता. हे काम अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आले होते; परंतु महापालिकेचा हा प्रयोग पूर्णत: फसल्याचे दिसून आले आहे.
आगरी समाज हॉल ते सावरकर चौक या ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण; यामध्ये ९० टक्के डांबर तर १० टक्के प्लॅस्टिकचे मिश्रण होते. यात सुमारे चार टन प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला होता; परंतु अवघ्या सहा महिन्यांतच हा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे महापालिकेचे २५ लाख रुपये पाण्यात गेले आहेत.
संबंधित कंत्राटदाराला पत्र काढले आहे. प्लॅस्टिक मिश्रीत रस्त्याच्या कामाचा सुरक्षा कालावधी एक वर्षाचा आहे; परंतु सहा महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्याचे पुन्हा काम करण्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आले आहे.
- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महानगरपालिका