सरकारी कार्यालयांवर प्लॅस्टिकची आच्छादने, कर्जतमध्ये अनेक इमारती जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 03:19 AM2019-08-15T03:19:44+5:302019-08-15T03:20:39+5:30

कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात.

Plastic overlays at government offices | सरकारी कार्यालयांवर प्लॅस्टिकची आच्छादने, कर्जतमध्ये अनेक इमारती जीर्ण

सरकारी कार्यालयांवर प्लॅस्टिकची आच्छादने, कर्जतमध्ये अनेक इमारती जीर्ण

googlenewsNext

- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारती जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे दरवर्षी या सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे बंद करावी लागतात. या वर्षी तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या छपरांवर आच्छादन म्हणून तब्बल १८०० चौरस मीटर प्लॅस्टिक आणण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील बहुतेक सर्व शासकीय कार्यालये ही जुनी आहेत. तहसील कार्यालय तर ब्रिटिशकालीन असून, त्यातील अनेक इमारती या जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतींच्या छपराला छिद्र पडले असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू असते. त्यामुळे सरकारी कार्यालयातील कागद भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत त्या सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतींना प्लॅस्टिक आच्छादन टाकून झाकून ठेवण्यात येतात. त्यामुळे कर्जत तालुक्यातील राज्य सरकार संबंधित सर्व शासकीय कार्यालये ही एकाच इमारतीत यावीत, असा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होता. स्थानिक आमदार सरकारने निधी द्यावा, या मागणीसाठी सातत्याने पुढाकार घेताना दिसत होते. स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी या शासकीय भवनसाठी आपला आग्रह असलेली कृषी संशोधन कार्यालयाच्या अखत्यारित असलेली जमीन मिळावी, असा हट्ट धरला होता. मात्र, दिल्लीपर्यंत जाऊनही कृषी विभाग जमीन देत नसल्याने आता हे प्रशासकीय भवन पोलीस ग्राउंड परिसरात होऊ घातले आहे.

तरीही शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने शासकीय कार्यालयाच्या इमारती प्लॅस्टिक आच्छादन टाकून त्यांची छपरे झाकली जात आहेत. त्यात कर्जत तहसील कार्यालयाची इमारत, तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेले सेतू कार्यालय, त्याच परिसरात असलेल्या पोलीस ठाण्याची आरोपी कोठडी, सहनिबंधक कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय आणि तेथील रेकॉर्ड रूम यांचा समावेश आहे. अभिनव शाळेच्या परिसरात असलेले दिवाणी न्यायालय, बाजारपेठ भागात असलेली पोलीस कॉलनी, पोलीस निरीक्षकांचा बंगला, पोलीस उपाधीक्षकांचे कार्यालय तसेच भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत, त्याच वेळी कर्जत-भिसेगाव आणि नेरळ येथील महसूल खात्याच्या गोडाऊनचा समावेश आहे. तर माथेरान येथील महसूल अधीक्षक कार्यालय, पोलीस ठाण्याची इमारत, पोलीस वसाहत या इमारतींचे छप्पर हे प्लॅस्टिक आच्छादन टाकून झाकले आहे.तब्बल १८०० चौरस मीटर कापड त्या सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर आच्छादन टाकण्यासाठी लागले आहे.

शासकीय कार्यालये एका छताखाली यावीत, ही कर्जत तालुक्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. कर्जत पोलीस ग्राउंडच्या तहसीलदार बंगला परिसरात सर्व शासकीय कार्यालये एका इमारतीत येणारा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे आणखी एका वर्षाने सरकारी कार्यालयांना प्लॅस्टिक आच्छादनाचे छप्पर टाकण्याची वेळ येणार नाही.
- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, बांधकाम विभाग, कर्जत

१८०० चौ.मी कापड लागले
या सर्व इमारतीच्या छपरावर आच्छादन टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्लॅस्टिक कापड दिले आहे. ते कापड सार्वजनिक बांधकाम विभागाने मजूर घेऊन टाकले आहेत. १८०० चौरस मी. प्लास्टिक कापड अच्छदानदासाठी लागले.

प्लॅस्टिक आच्छादन टाकलेली सरकारी कार्यालये

हिवाळ्यात काढणार अच्छादने
हिवाळा सुरू झाल्यानंतर त्या सर्व इमारतीवरील प्लॅस्टिकची अच्छादने
पुन्हा काढण्यात येणार असल्याचे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ए. आर. चौधरी यांनी सांगितले
आहे.

Web Title: Plastic overlays at government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.