सुधागड तालुक्यात प्लॅस्टिकबंदी धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:38 AM2019-06-19T00:38:03+5:302019-06-19T00:38:11+5:30
पाली शहरासह ग्रामीण भागात सर्रास वापर; मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचे आरोग्य धोक्यात
- विनोद भोईर
पाली : राज्यभरात गेल्या वर्षी २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेक ठिकाणी छापे टाकून प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सुरुवातीस काही महिने बंदीची चांगली अंमलबजावणी झाली. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने सध्या पालीसह ग्रामीण भागात, मच्छी विक्रेते, व्यापारी, छोटे दुकानदार, टपरी, हातगाडीवाले, फेरीवाल्यांकडून सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर होत आहे. प्लॅस्टिकचा वाढता वापर पर्यावरणाच्या ºहासास कारणीभूत ठरत आहे.
राज्य सरकारने प्लॅस्टिक उत्पादन, वापर, विक्री, साठवण, थर्माकोल आदींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. या निर्णयानुसार विघटन होत नसलेल्या वस्तू वापरण्यास मनाई केली आहे. काही वस्तूंच्या उत्पादनाची गरज लक्षात घेऊन त्या वस्तूंवर कठोर नियम व अटी लादून परवानगी देण्यात आली आहे. समाज माध्यमांमध्ये त्यासंदर्भात जनजागृती सुरू झाली, मात्र सध्या जिल्ह्यात वेगळे चित्र आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकबंदीच्या सूचना व पत्रके देण्यात आली.
काही ठिकाणी व्यापाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. त्यानंतर काही दुकानदारांवर प्लॅस्टिक पिशवी विक्री व ठेवल्याप्रकरणी दंडही करण्यात आला. नागरिकही बाजारात हातात कापडी पिशव्या घेऊन येताना दिसत होते. मात्र, आता पुन्हा दोन-तीन महिन्यांपासून प्लॅस्टिकने डोके वर काढले असून कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी
१५ मार्च २०१८ रोजी राज्य मंत्रिमंडळाने एक वेळ वापरण्यात येणाºया प्लॅस्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. विशेषत: मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांचा विरोधात पर्यावरणीय मोहिमेची सुरू झाल्यानंतर विघटन न होणाºया प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली; परंतु नियमांत बदल करीत २0 मायक्रॉनपासून ६0 मायक्रॉनपर्यंत प्लॅस्टिक
पिशव्यांच्या जाडीत वाढ झाली.
शेती, जनावरांना धोका
ग्रामीण भागात प्लॅस्टिक कचरा उकिरड्यावर टाकला जातो. काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून अन्नपदार्थ टाकले जातात. मग मोकाट कुत्रे व गुराढोरांच्या पोटात प्लॅस्टिक जाते. त्यामुळे त्यांचा मृत्यूही ओढावत आहे. शेतजमिनीवर प्लॅस्टिक असेच पडून राहिल्याने जमिनीचा पोत आणि सुपीकता कमी होते.
प्लॅस्टिकचा वापर आणि विल्हेवाट लावताना जमिनीचा कचरा, पाणीसाठा आणि नैसर्गिक परिसर त्यामध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. या गुंतागुंतीमध्ये त्या ठिकाणचे वन्यजीवन आणि मानव वस्तीला धोका निर्माण झाला आहे.
समाज प्रबोधनाची गरज
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणे लोकांनी थांबवावे यासाठी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटना व सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व पर्यावरणाला धोका टाळता येईल.
प्लॅस्टिक विकणाºया व्यापाºयांवर कारवाई केली आहे. त्यांचे प्रबोधनही केले आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि लोकांचे असहकार्य यामुळे कदाचित प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री व वापर वाढला आहे. त्यामुळे लोकांनी स्वत: या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्लॅस्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे.
- गणेश बाळक, सरपंच पाली