कामोठेत दोन वाहनांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 11:54 PM2020-02-03T23:54:03+5:302020-02-03T23:54:39+5:30
गेल्या काही दिवसांपासून एकाच नंबरच्या दोन गाड्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे.
कळंबोली : गेल्या काही दिवसांपासून एकाच नंबरच्या दोन गाड्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे. बनावट नंबर प्लेट तयार करून आरटीओचा महसूल बुडवण्याचा प्रकार वाढत चालले आहेत. कामोठे येथील एका वाहतूकदारांच्या ट्रेलरचा नंबर टेम्पोला वापरून सर्रासपणे व्यवसाय केला जात आहे. परंतु त्या बनावट नंबर वापरणाऱ्या टेम्पो चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर मूळ ट्रेलर मालकाला चलनाद्वारे दंडाची रक्कम पाठवण्यात आली. जवळपास पाच वेळा दंडाचे संदेश संबंधिताला आल्याने त्याने यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
कामोठे येथील तक्रारदार यांची एम एच ४६ बीएफ ९३७७ क्रमांकाचा ट्रेलर आहे. पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या वाहनाची पासिंग करण्यात आली आहे. हा ट्रेलर पाच ते सहा दिवसांपासून कोल्हापूर येथे उभा आहे. मात्र असे असताना त्यांना १ फेब्रुवारी रोजी दंडाचे चलन वाशी वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. त्यांचा दंड २८०० रुपये का येत आहे. त्या अगोदर परळ येथूनही आठशे रुपये दंडाचे चलन मुंबई वाहतूक पोलिसांनी पाठवले आहे. तत्पूर्वी दोनशे रुपये दंडाच्या संदेश चेंबूर येथून आला आहे. त्याशिवाय सानपाडा, खारघर वाहतूक शाखेचे चलन सुद्धा त्यांना संदेशाद्वारे पाठवले आहे.
वास्तविक पाहता हा ट्रेलर वरील परिसरात गेलाच नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेष म्हणजे या क्रमांकाची नंबर प्लेट लावून एक टेम्पो चालक व्यवसाय करीत असल्याचे इमेज पाहिल्यानंतर उघड झाले आहे. त्या टेम्पो चालकाने परिवहन विभागाचा कर बुडवला आहे. तसेच अशा प्रकारे बनावट पद्धतीने नंबर प्लेट लावून तो व्यवसाय करीत असल्याने हा फसवणुकीचा ही प्रकार आहे. या चालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वाहतूकदार गोरखनाथ आहेर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांना लेखी तक्रार केली आहे. तसेच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांची भेट घेऊन त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांना भेटून याबाबत वस्तुस्थिती मांडणार असल्याचे आहेर यांनी सांगितले. तुपे यांनी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून माहिती मागवण्यात येणार आहे. अशाप्रकारे बनावट नंबर प्लेट लावण्याच्या तक्रारीही वाहतूक पोलीस आणि आरटीओकडे येत आहेत.
माझ्या मालकीच्या ट्रेलरची बनावट नंबर प्लेट तयार करून टेम्पो चालकाने आमची आणि शासकीय यंत्रणेची फसवणूक केली आहे. त्याने केलेल्या वाहतुकीच्या नियमांची पायमल्लीचा दंडाचे संदेश मला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
- गोरखनाथ आहेर, तक्रारदार कामोठे