खेळाची मैदाने पार्किंगच्या कचाट्यात
By admin | Published: January 9, 2017 06:39 AM2017-01-09T06:39:58+5:302017-01-09T06:39:58+5:30
शेतीच्या जागांवर सिमेंटची जंगले वाढून त्यांनी शहरी रूपडे परिधान केले आहे. त्यामुळे विकासासाठी जागेची कमतरता पडत
आविष्कार देसाई / अलिबाग
शेतीच्या जागांवर सिमेंटची जंगले वाढून त्यांनी शहरी रूपडे परिधान केले आहे. त्यामुळे विकासासाठी जागेची कमतरता पडत आहे. त्यातच पर्यटनाच्या नावाखाली खेळाच्या मैदानावर पार्किंग वाढल्याने मुलांना खेळण्यासाठी मैदानेच उरली नाहीत. अलिबाग समुद्रकिनारी असणारे क्रीडाभुवन आणि जेएसएमचे मैदान हे त्यातीलच एक आहे. जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या या मैदानावर सुटीच्या हंगामासह अन्य दिवशीही वाहनांचा गराडा असतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने ही मैदाने खेळण्यासाठी खुली करून द्यावीत, अशी मागणी केली जात आहे.
अलीकडेच अलिबाग शहर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. एक दिवसात पिकनिकचा अनुभव घेण्यासाठी येथे वीक एण्डलातर तोबा गर्दी असते. पर्यटक अलिबागमध्ये दाखल होताना त्यांच्यासोबत विविध वाहने घेऊन येतात. प्रमुख समुद्रकिनाऱ्यावरून कुलाबा किल्ल्याचे मनोहरी दृश्य दिसते, तसेच या ठिकाणी दर्जेदार हॉटेल्स्, रेस्टारंट, करमणुकीसाठी बोट सफारी, जेट स्कि, ए टिव्ही बाईक राईड, घोडागाडी, उंटाची सफर, यासह लहान मुलांसाठी विविध खेळाची साधने उपलब्ध आहेत. तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सातत्याने लागलेलेच असतात. त्यामुळे या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गर्दी होते. पर्यटक ज्या वाहनांतून येतात. ती वाहने पार्किंग करण्यासाठी ते थेट क्रीडाभुवनसह जेएसएम महाविद्यालयाच्या मैदानावर बिनदिक्कतपणे पार्किंग करतात. तेथे वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग केल्याने खेळाचे मैदान अक्षरश: झाकून जाते. मोठ्या संख्येने वाहनाचा खच तेथे असतो. त्यामुळे मुलांना, खेळाडूंना खेळायचे झाल्यास त्यांची चांगलीच अडचण होते. मैदाने खेळण्यासाठी आहेत; परंतु तेथे वाहनांचे पार्किंग असल्याने कोठे खेळणार? असा प्रश्न मुलांना पडतो.
शहरात पर्यटन वाढल्याने रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक विकास होणार आहे. हे मान्य असले, तरी खेळाच्या मैदानावर पार्किंग करून देणे, हे कोणालाही मान्य होणार नाही. अलिबाग नगरपालिका पर्यावरण व स्वच्छताकर पर्यटकांकडून वसूल करते. मात्र, पार्किंगच्या प्रश्नावर त्यांनी ही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या संदर्भातक्र ीडा भुवन मैदानावर पार्किंग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी सांगितले.
प्रशासनाने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. पार्किंगमुळे मुलांना खेळण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. काही मैदानांवर बिल्डरांचा डोळा असतो, तर काही मैदाने पार्किंगच्या कचाट्यात सापडलेली असतात. त्यांना वाचविण्यासाठी सर्वांनीच ‘मैदान बचाओ’साठी लढा उभारला पाहिजे.
-अॅड. सुशील पाटील, शिवसेना
मैदानावरील पार्किंग, अतिक्रमण हटविण्यासाठी २०१४ रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. क्रीडाभुवन येथील अनधिकृत पार्किंग दूर करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना नुकतेच पत्र दिले आहे. जेएसएमच्या मैदानावर विविध महोत्सव होतात आणि त्याचे पार्किंग मात्र क्रीडाभुवनच्या मैदानावर, त्यामुळे खेळाला जागाच नाही.
-दिलीप जोग, सामाजिक कार्यकर्ते