डाक विभागातील कोरोना योद्ध्यांकडून सुखद धक्का; निवृत्त वेतनधारकांना घरपोच वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:06 AM2020-05-03T01:06:45+5:302020-05-03T01:06:55+5:30
रायगडमधील तब्बल १४१ जणांना २५ लाखांची रक्कम अदा
अलिबाग : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्याचा फटका निवृत्ती वेतनधारकांनाही बसणार होता. मात्र, अलिबाग येथील रायगडच्या डाक विभागाने वयोवृद्ध असणाऱ्या १४१ निवृत्ती वेतनधारकांना तब्बल २५ लाख रुपयांचे निवृत्तीवेतन घरपोच दिले आहे. बँकांच्या लांबच लांब रांगा आणि एटीममधून पैसे काढण्याचा त्रास वाचल्याने सर्व निवृत्ती वेतनधारकांना एक प्रकारे सुखद धक्काच बसला आहे. डाक विभागाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कोरोनामुळे सर्वत्रच हाहाकार उडाला आहे. सरकार आणि प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाचा सहज संसर्ग होत असल्याने अशा नागरिकांना जास्त धोका होत आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना एप्रिल महिन्याची पेन्शन कशी मिळणार, याची धास्ती लागली होती.
अलिबागच्या डाक विभागाने निवृत्ती वेतनधारकांची अडचण समजून घेतली. त्यांनी अलिबाग, पेण, पोयनाड, कुरूळ, आवास, रोहा या भागातील १४१ निवृत्ती वेतनधारकांपर्यंत तब्बल २५ लाख ११ हजार ९०० रुपयांची पेन्शन घरपोच अदा केली आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या चेहºयावरील आनंद पाहण्यासारखा होता.
संकटमय प्रसंगात विभागातील पोस्टमन कर्मचाऱ्यांनी कणखर भूमिका दाखवून निवृत्त्तीधारकांना घरपोच पेन्शन देताना ‘कोरोना योद्धा’ ही बिरुदावली सार्थ ठरवत डाक विभागाची मान अभिमानाने उंचावल्याचेही पोस्ट मास्टर अनुराधा पेणकर यांनी स्पष्ट केले.
सेवा देणाºया सर्व सहकाºयांचे आभार सहायक अधीक्षक सुनील पवार यांनी मानले. निवृत्ती वेतनधारकांना घरपोच पेन्शन देता यावी, यासाठी परेश राऊत, किशोर मढवी, मधुकर पाटील, मीना म्हात्रे, गंगाराम साटम, महेंद हुमणे, किशोर नाखवा, सुग्रीव टोगरे, इस्माइल हमदुले, गणपत ढोले, योगेश मते यांनी मेहनत घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.
ज्येष्ठांकडून आभार
रायगड डाक विभागामार्फत प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. ९६ व ९२ वर्षांचे आजोबा आणि ८६ वर्षांच्या आजीला आवास येथे घरपोच निवृत्तीवेतन दिल्यानंतर मिळालेला आशीर्वाद लाख मोलाचा असल्याची भावना पोस्ट मास्टर अनुराधा पेणकर यांनी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशी ठिकाणे घरपोच सेवेतून वगळावी लागत असल्याची माहिती तक्र ार निवारण अधिकारी हनुमंत चीरमरे यांनी दिली होती.